सामाजिक, आर्थिक विकासासाठी निधी उभारण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य लॉटरीला मिळणारा प्रतिसाद कमी होत असून, सहा वर्षांपूर्वी वर्षांला ३० ते ३५ कोटी रुपयांचा नफा कमावणाऱ्या राज्य लॉटरीच्या हाती गेल्या तीन वर्षांंत केवळ २२ कोटी रुपयेच लागले आहेत.
अल्पबचत व राज्य लॉटरी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २००५ ते २०१० या पाच वर्षांत लॉटरीची १ हजार ३७० कोटी तिकिटे खपली. त्यातून सरकारला १४० कोटी रुपयांचा महसूल मिळाला, पण एप्रिल २०१० ते जून २०१३ या कालावधीत केवळ २२.१८ कोटी नफा कमावता आला. गेल्या तीन वर्षांत लॉटरी विभागाने १९ बम्पर सोडती काढल्या. या कालावधीत सुमारे २८ कोटी तिकिटे विकली गेली. यात साप्ताहिक सोडतीची २६.९१ कोटी, बम्पर सोडतीची १.४४ कोटी तिकिटे होती. राज्यात १९६९ मध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात झाली. मटका, जुगार या व्यसनांना प्रतिबंध घालणे आणि त्या माध्यमातून जनसामान्यांची फसगत टाळण्यासाठी राज्य लॉटरी सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले, पण अजूनही राज्यात जुगाराचा समांतर प्रवास सुरूच आहे. दुसरीकडे राज्य लॉटरीसह सिक्कीम, मिझोराम, गोवा या राज्यांच्या पारंपरिक पेपर आणि ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर महसूल गोळा केला जातो. या महसुलातील राज्य लॉटरीचा वाटा मात्र कमी होत आहे.
महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने २००७ पासून राज्यात काढण्यात येणाऱ्या सर्व लॉटरी सोडतींवर कर लावण्यात आला. नवीन बक्षीस योजनांच्या सोडती सुरू करता याव्यात म्हणून दोन अंकी लॉटरी योजना स्थगित करण्यात आल्या होत्या. सरकारच्या अध्यादेशाला परप्रांतीय लॉटरी चालकांनी न्यायालयात आव्हान दिल्यानंतर दोन वष्रे हा कर मिळू शकला नाही. २००९ मध्ये न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा करवसुली सुरू झाली. आतापर्यंत कोटय़वधी रुपयांचा कर सरकारी तिजोरीत जमा झाला आहे. सध्या राज्य लॉटरीसह मिझोराम, सिक्कीम आणि गोवा या राज्यांच्या पेपर लॉटरीच्या सुमारे २२ सोडती काढल्या जातात. मात्र, ऑनलाईन लॉटरींची संख्या मोठी आहे. एकटय़ा गोवात १६१ ऑनलाईट लॉटरी सुरू आहेत. केंद्रीय अधिनियम १९९८ च्या नियमाप्रमाणे संपूर्ण देशात लॉटरीचा व्यवसाय सुरू आहे. केंद्राच्या नियमाला अनुसरून राज्य सरकारनेही महाराष्ट्र राज्य लॉटरी विनिमय २००० भाग १ तयार केला. मध्यंतरीच्या काळात अवैध लॉटरीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात फोफावला. बेरोजगार लोक दोन अंकी आणि एक अंकी लॉटरीकडे आकर्षित झाले, पण त्यात बरीच कुटुंबे उध्वस्त झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑनलाइन लॉटरींची लोकप्रियता
अजूनही अवैध लॉटरींवर पूर्णपणे अंकूश लावता आलेला नाही. ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली लोकांना कुपन्स देऊन त्यांची फसवणूक करणे सुरूच आहे. राज्य लॉटरीचा नफा कमी होण्यामागे इतर राज्यांमधील ऑनलाईन लॉटरींची वाढती लोकप्रियता हे कारण मानले जात आहे. कमी महसूल मिळत असल्याने राज्य लॉटरी विभागावर चिंतन करण्याची वेळ आली आहे.

More Stories onलॉटरीLottery
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra state lottery response declining
First published on: 25-12-2013 at 02:38 IST