गत विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मनसेने एकूण ११० जागा लढवल्या. त्यात कल्याण ग्रामीणचा अपवाद वगळता अन्यत्र सर्व मनसे अपयशी ठरली. आपल्या भाषणांनी प्रचारसभा गाजवणाऱ्या राज ठाकरे यांच्या वाटयाला हे अपयश का आले? त्यामागे काय कारणे आहेत?. निवडणुकीआधी राज ठाकरेंनी या पाच चुका टाळल्या असत्या तर आज चित्र वेगळे दिसले असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही विधानसभा निवडणूक सोडून दिली. निवडणूक जिंकण्याची जिद्द, इच्छा त्यांच्यामध्ये दिसली नाही. याउलट दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर जोरदार प्रचार केला.

– लोकसभेच्या निकालानंतर राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही असा संदेश जनतेमध्ये गेला. याउलट कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. अखेर नेते, कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे राज ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. एकूणच या घडामोडींमुळे पक्षाला मरगळ आली. ज्याचा कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम झाला.

– मनसेने लोकसभा निवडणूक न लढवताही राज ठाकरेंनी मोदी-शाहंविरोधात मोर्चा उघडला होता. प्रचाराची एक वेगळी पद्धत यावेळी पाहायाल मिळाली. राज ठाकरे भाषण करताना मध्येच थांबून उपस्थितांना व्हिडिओ दाखवून मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करायचे. ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे त्यांचे शब्द लोकप्रिय झाले होते. खरंतर मनसे निवडणूक लढवत नव्हती. त्यामुळे त्यांनी प्रचारात उतरण्याची गरजच नव्हती. याउलट विधानसभेला त्यांनी अशा पद्धतीचा प्रचार केला असता तर सत्ताधाऱ्यांना सावरण्याची संधी मिळाली नसती.

– लोकसभेला राज यांनी ज्या आक्रमक पद्धतीने प्रचार केला होता. तशीच अपेक्षा विधानसभेला त्यांच्याकडून होती. पण राज यांच्या प्रचारात ती आक्रमकता, कल्पकता दिसली नाही. निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांची ईडीकडून चौकशीही झाली होती. प्रचारात तो जोश दिसत नसल्यामुळे राज ठाकरे बॅकफुटवर गेल्याची एक चर्चा सुरु झाली.

– शरद पवारांना ईडीकडून नोटीस आल्यानंतर त्यांनी तोच डाव सरकारवर उलटवला. जनतेची सहानुभूती मिळवली. पण राज ठाकरे यामध्ये कमी पडले. ईडीकडून चौकशी झाल्यानंतर राज ठाकरेंनी मौन बाळगले होते. एरवी फेसबुक, टि्वटरवर सक्रीय असणारे राज ठाकरे काहीच बोलले नाहीत. थेट प्रचारामध्ये त्यांनी भाष्य केले. तो पर्यंत उशीर झाला होता. त्याचवेळी शरद पवारांनी भर पावसात भाषण करुन पुन्हा एकदा जनतेची सहानुभूती मिळवली तर राज ठाकरेंनी पावसामुळे सभा रद्द केली. लोकसभेच्या निकालानुसार महायुती विधानसभेच्या २०० पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये आघाडीवर होती. पण म्हणून शरद पवार हिम्मत हरले नाहीत त्यांनी उलट पायाला भिंगरी लावून मतदारसंघ पालथे घातले. ज्याचा परिणाम राष्ट्रवादीच्या निकालात दिसून आला तर मनसे पुन्हा एकदा अपयशी ठरली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election result 2019 mns lost five reasons dmp
First published on: 25-10-2019 at 17:52 IST