मुंबई, पुणे, कोकणात पावसाची संततधार; ३ डिसेंबरपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार कोसळण्याची शक्यता

डिसेंबर महिन्यामध्ये पाऊस का पडतोय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर यामागील कारण आहे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा

Maharashtra Rain
तीन डिसेंबरपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये पडणार पाऊस (प्रातिनिधिक फोटो)

मुंबई, पुणे आणि कोणक किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये बुधवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई मुख्य शहरांबरोबरच उपनगरांमध्येही सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरु आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास रायगड, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे आणि सातारा जिल्ह्यामधील काही ठिकाणी सौम्य स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यात आहे. सकाळी ११ च्या सुमारास हा इशारा देण्यात आला असून तो पुढील तीन ते चार तासांसाठी देण्यात आलाय.

पाऊस कशामुळे?
दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती झाली आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केली आहे.

या जिल्ह्यांमध्ये तीन दिवसांमध्ये पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस म्हणजेच १ डिसेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान राज्याच्या अनेक भागांत जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ४८ तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड अशा विविध ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे.

तापमानात घट
राज्यात मंगळवारी दिवसभरात कमाल तापमानात घट झाल्याची नोंद करण्यात आली असून कोणत्याही भागात पाऊस झालेला नाही. विविध ठिकाणी ढगाळ हवामान होते. राज्यात सर्वाधिक ३४.५ अंश सेल्सिअस तापमान रत्नागिरीत, तर सर्वात कमी १०.९ अंश सेल्सिअस तापमान गोंदियात नोंदवण्यात आले.

वादळी वारे..
’उत्तर महाराष्ट्रात वादळी हवामानासह वाऱ्याचा वेग ४५-५५ किलोमीटरवरून ताशी ६५ कि.मीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ’दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनाऱ्यावर वादळी हवामानासह वाऱ्याचा वेग ताशी ४०-५० कि.मी. प्रतितास जाण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra weather forecast mumbai rain it will be raining for next few days says imd scsg