गुजराती, हिंदी, इंग्रजी भाषेतील पुस्तकांनाही मान

वाई : ‘भिलार’ आता बहुभाषिक पुस्तकांचे गाव होणार आहे. महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळी देशभरातूनच पर्यटक येतात. त्यामुळे इथे येणाऱ्या या बहुभाषिक पर्यटकांचा विचार करत भिलारमध्ये अन्य भाषांचीही पुस्तके ठेवण्याचे नियोजन शासनाने केले आहे.

देशातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून महाबळेश्वर येथील ‘भिलार’ गाव नुकतेच देशभर नावारूपाला आले. महाबळेश्वर, पाचगणीला येणारे असंख्य पर्यटक भिलारलाही भेट देऊ लागले आहेत. पुस्तकांच्या सान्निध्यात इथे राहत पर्यटनाचा एक नवा आविष्कार ते अनुभवू लागले आहेत. मात्र महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळी देशभरातून पर्यटक येतात. यामध्ये गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषा जाणणारे अनेक पर्यटक असतात. इथे असणाऱ्या केवळ मराठी पुस्तकांमळे या पर्यटकांची गैरसोय होत होती. याचाच विचार करत आता भिलारमध्ये अन्य भाषेची पुस्तके देखील ठेवण्यास लवकरच सुरुवात केली जाणार आहे.

सध्या भिलार येथे पंचवीस घरांमध्ये मराठी भाषेतील विविध साहित्य प्रकारातील पुस्तके ठेवलेली आहेत. आणखी पाच घरांची भर त्यात पडत आहे. इथे पुस्तके ठेवण्यासाठीची रचना करण्याचे काम सध्या सुरू आहे. याबरोबरच येथील खुले सभागृह (अ‍ॅम्फी थिएटर) बांधून पूर्ण झाले आहे. लोकांचा पुस्तकांच्या गावाकडे येण्याचा ओघ वाढतो आहे. विविध व्याख्याने, कार्यशाळा भिलारमध्ये होत आहेत. संस्कार भारती, पुणे, मुंबई शासकीय महाविद्यालय प्राचार्य संघ आदींच्या कार्यशाळा येथे नुकत्याच झाल्या आहेत. विदर्भ, मराठवाडा येथूनही विद्यार्थी, अभ्यासक आदींनी मोठया संख्येने भेट दिली.

पुस्तकांच्या गावात आता एखादे पुस्तक वाचक, अभ्यासकाला आवडल्यास ते पुस्तक लगेच विकत घेण्यासाठी पुस्तक विक्री केंद्र देखील सुरू केले आहे.

पवारांची ग्रंथभेट

शरद पवार यांनीही उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी पुस्तकांचे गाव भिलारला सलग दोन दिवस भेट दिली होती. पुस्तकांच्या गावाचे ते तसे पहिले वाचक ठरल्याची नोंद त्यांनी लिहिलेल्या अभिप्रायाची नोंदपुस्तकाच्या गावात आहे. या वेळी त्यांनी पुस्तकांच्या गावाला कशी मदत करता येईल याची माहिती घेतली. यानुसार त्यांनी नुकतीच पुस्तकांच्या गावाला तब्बल दहा लाख रुपयांची पुस्तके भेट दिली. यामध्ये कथा, कांदबऱ्या, ललित, वैचारिक, संदर्भ, इतिहास, राज्यशास्त्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, जागतिक घडमोडी आदींविषयी राज्यातील मान्यवर प्रकाशकांची ही पुस्तके आहेत.

गेले वर्षभर भिलारला मराठीबरोबरच परभाषक वाचकांचा देखील मोठा प्रतिसाद आहे.  इथे येणाऱ्या बहुभाषक पर्यटकांचा विचार करत लवकरच इथे अन्य भाषेतील पुस्तके ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या भाषांमधील पुस्तकेही येथे ठेवण्यात येतील. यासाठी महाराष्ट्रातील हिंदी व गुजराती साहित्य अकादमीची मदत घेण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विनोद तावडे, शिक्षणमंत्री.