नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे पैसे मतदारांना वाटप करणाऱ्या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. सातपूरच्या अशोक नगरमध्ये ही कारवाई करण्यात आली. जितेंद्रसिंग पवार आणि अनिल शेवाळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं असून त्यांच्याकडून २४ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच संशयितांना तात्काळ तडिपार करण्यात आले.

शनिवारी दुपारी दीड वाजता हा प्रकार घडला. सातपूर येथील अशोक नगर येथे जितेंद्रसिंग पवार आणि अनिल शेवाळे हे मतदारांना प्रलोभन म्हणून पैसे वाटताना आढळून आल्यानंतर फिरत्या पथकाने त्यांच्याकडे तपासणी केली. तेव्हा त्यांच्याकडे २४ हजार ५० रूपये रोख आणि प्रचाराचे इतर साहित्य आढळले. संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांच्या सूचनेनुसार संशयितांना तत्काळ तडिपार करण्यात आले आहे.