अविनाश पाटील

कृषिमालास भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी, भाजपच्या नेत्यांमध्ये असलेला कलह, दुष्काळ आणि टंचाईची पार्श्वभूमी, राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्याविरुद्ध उघडलेली आघाडी या सर्व कारणांमुळे लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात यशाची अपेक्षा बाळगून असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचा निकालानंतर भ्रमनिरास झाला आहे. मतदारांनी महाआघाडीला झिडकारत २०१४ च्या निकालाची पुनरावृत्ती करीत भाजप-सेना महायुतीच्या पदरात उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व म्हणजे सहाही जागा टाकल्या आहेत.

नाशिक मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना अधिक संधी असल्याचे त्यांचे विरोधकही मान्य करीत होते. नाशिक मतदारसंघात मागील ११ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सलग दुसऱ्यांदा एकच उमेदवार विजयी झालेला नसल्याचा दाखला देत प्रारंभी पक्षातूनच गोडसेंच्या उमेदवारीस झालेला विरोध मोडून काढण्यात पक्ष नेतृत्वास यश आले आणि त्यानंतर पक्ष एक होऊन निवडणुकीस सामोरा गेला. भाजपचे बंडखोर उमेदवार माणिक कोकाटे यांच्यामुळे मतविभागणी होऊन त्याचा फायदा २००९ प्रमाणे राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांना होण्याची अटकळही विरोधकांकडून बांधली जात होती. परंतु विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीची आस लागून असल्याने भाजप-सेनेचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने केलेला प्रचार गोडसेंच्या कामी आला. प्रमुख विरोधी उमेदवार समीर भुजबळ असल्याने गोडसेंचे काम अधिक सोपे झाले असेच म्हणावे लागेल. तुरुंगात जाऊन आलेल्या भुजबळ काका-पुतण्यामुळे युतीला प्रचारात आयताच मुद्दा मिळाला. तुरुंगात जाणारा लोकप्रतिनिधी हवा की निष्कलंक प्रतिमा असलेला खासदार हवा, या प्रश्नाचा शहरी मतदारांवर परिणाम झाला. त्यातच समीर भुजबळ यांच्या उमेदवारीस राष्ट्रवादी तसेच काँग्रेसमधूनही असलेला विरोध, आघाडीत असूनही प्रचारात काँग्रेसचा असलेला दुरावा आणि वंचित बहुजन आघाडीमुळे दुरावलेली हक्काची मतपेढी ही कारणे राष्ट्रवादीच्या पराभवास कारणीभूत ठरली.

दिंडोरीत यश महत्त्वाचे

दिंडोरी मतदारसंघात विजयाची हॅट्रिक करणारे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याविषयी मतदारांमध्ये असलेली नाराजी ओळखून भाजपने राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी पक्षप्रवेश केलेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देऊन मतदारसंघ पुन्हा आपल्याकडेच राखण्यात यश मिळविले. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविणाऱ्या डॉ. भारती पवार यांना मोदी लाटेत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यावेळी त्यांच्याविषयी मतदारांमध्ये निर्माण झालेली सहानुभूती आणि देवळा, निफाड, नांदगाव, कळवण या विधानसभा मतदारसंघांमध्ये खिळखिळी झालेली राष्ट्रवादीची अवस्था, असून नसल्यासारखी काँग्रेस, याचा फटका राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना बसला.

राष्ट्रवादीला जळगाव मतदारसंघात विजयाची अधिक अपेक्षा होती. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासारखा अनुभवी आणि दांडगा जनसंपर्क असलेला उमेदवार असल्यामुळे शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासह पक्षाच्या जवळपास सर्वच वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात कोणतीही कसर ठेवली नाही. त्यातच उमेदवारीतील कापाकापी आणि अमळनेरच्या मेळाव्यात मंचावरच जिल्हाध्यक्षांकडून माजी आमदारास झालेली मारहाण यामुळे भाजपची नाचक्की झाल्यामुळे देवकर यांचा विजय राष्ट्रवादीचे नेते निश्चित मानू लागले होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अखेरच्या क्षणी केलेली डागडुजी, मित्रपक्ष शिवसेनेचा रुसवा दूर करण्यात आलेले बऱ्यापैकी यश आणि खोलवर पसरलेले कार्यकर्त्यांचे जाळे याच्या बळावर भाजपने उन्मेष पाटील यांच्या रूपाने जळगावला नवीन खासदार दिला.

धुळे मतदारसंघात भाजपचे उमेदवार संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. भाजपचे बंडखोर उमेदवार आमदार अनिल गोटे यांच्याकडून वर्षभरापासून करण्यात येत असलेले आरोप, पुरती हयात काँग्रेसमध्ये गेल्याने निवडणूक जिंकण्याचे कसब अंगी भिनलेले माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी आमदार मुलगा कुणाल पाटील यांना खासदार करण्यासाठी आखलेले डावपेच उधळून लावण्यात डॉ. भामरे यशस्वी झाले. इंदूर-नरडाणा-मनमाड-धुळे रेल्वेमार्ग वास्तवात आणण्यासाठी भूमिपूजनामुळे टाकलेले पाऊल, प्रलंबित सुलवाडे जामफळ सिंचन प्रकल्पास दिलेली चालना, इंडस्ट्रिअल कॉरिडोरमध्ये धुळ्याच्या उद्योगांना समाविष्ट करण्यासाठी दिलेले आश्वासन, जवान चंदू चव्हाणच्या सुटकेच्या अनुषंगाने झालेल्या टीकेमुळे मिळालेली सहानुभूती, मतदारसंघात झालेली सिंचन आणि रस्त्यांची कामे तसेच मोदींचा करिष्मा यामुळे डॉ. भामरेंचा विजय सुकर झाला. अल्पसंख्याकांचे वर्चस्व असलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघात या निवडणुकीत कमी झालेले मतदान आणि उलट मालेगाव बाह्य़ मतदारसंघात तुलनेने अधिक झालेले मतदानही डॉ. भामरेंसाठी फायदेशीर ठरले.

काँग्रेसच्या विजयाची प्रबळ अपेक्षा असलेल्या नंदुरबार मतदारसंघात भाजपच्या डॉ. हीना गावित यांनी सलग दुसऱ्यांदा विजयश्री मिळवीत काँग्रेसचे अनुभवी उमेदवार अ‍ॅड. के. सी. पाडवी यांना पराभूत करीत नंदुरबार हा आता काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला नसल्याचे दाखवून दिले.

जळगाव, रावेरमध्ये मोठे मताधिक्य

जळगाव जिल्हा हा १५ वर्षांपासून भाजप-सेना युतीचा बालेकिल्ला राहिला आहे. त्याचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसून आले. जळगाव आणि रावेर या दोन्ही जागा पुन्हा एकदा भाजपने सहजरीत्याजिंकल्या. रावेर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्याविरुद्ध शेवटपर्यंत राष्ट्रवादीला सक्षम उमेदवारच न मिळाल्यामुळे हार मानत मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला. तिथेच रक्षा खडसे यांचा विजय निश्चित झाला होता. काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी आपल्या क्षमतेनुसार लढत देण्याचा प्रयत्न केला. मुळात जळगाव महापालिकेत १० वर्षांपासून काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. जिल्हा परिषदेतही दुहेरी आकडा गाठू न शकलेल्या या पक्षाचा मागील निवडणुकीत जिल्ह्य़ातून एकही आमदार निवडून आलेला नाही. अपक्ष शिरीष चौधरी यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशी मरणासन्न अवस्था असलेल्या पक्षाच्या उमेदवाराचे लोकसभा निवडणुकीतील भविष्य आधीच स्पष्ट झाले होते.