वीज वितरण व्यवस्थेत महत्वाचे माध्यम ठरणाऱ्या रोहित्रांच्या (ट्रान्सफॉर्मर्स) चोरीच्या घटना वाढू लागल्याने महावितरण कंपनीला घाम फुटला असून गेल्या दोन वर्षांत पश्चिम विदर्भातून लाखो रुपये किमतीचे तब्बल ७४ रोहित्रे चोरीला गेले आहेत. चोरटय़ांपुढे हतबल ठरलेल्या महावितरण कंपनीने आता रोहित्रांकडे जागरूक नागरिकांनी लक्ष ठेवण्याचे आणि चोरटय़ांना पकडून देण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम विदर्भात रोहित्रांमधील तांब्याची तार आणि ऑईल चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. ग्रामीण भागात या रोहित्र चोरटय़ांचा हैदोस वाढला आहे. या टोळीच्या कारवायांमुळे महावितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान होतच आहे, शिवाय ग्राहकांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे. एकदा रोहित्र चोरीला गेल्यानंतर त्या भागातील वीज पुरवठा नवीन रोहित्राची व्यवस्था होईपर्यंत खंडित होतो. सिंचनापासून शेतकऱ्यांना वंचित रहावे लागते. ग्राहकसेवा विस्कळीत होत असल्याने ग्राहकांचा महावितरणवर रोष निर्माण होतो.
रोहित्रांवर लक्ष ठेवण्यासाठी कुठलीही स्वतंत्र यंत्रणा नसल्याने रोहित्र चोरीला गेल्यानंतरच महावितरण कंपनीला माहिती मिळते. रोहित्र तत्परतेने लावणेही शक्य नाही. गेल्या दोन वर्षांत अमरावती परिमंडळाच्या क्षेत्रातून ७४ पेक्षा जास्त रोहित्रांची चोरी झाली आहे, अशी माहिती महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. रोहित्र चोरीच्या या घटना चिंताजनक असून यासंदर्भात पोलिसांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. ग्राहकांनीही आता सतर्क राहून रोहित्र चोरटय़ांना पकडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
वीज रोहित्रांमधील तांब्याचा तारा चोरण्यासाठी त्या भागातील वीज पुरवठा खंडित करून रोहित्र खाली काढले जाते. तांब्याची तार आणि ऑईल काढून अनेकदा सांगाडा त्याच ठिकाणी टाकून दिला जातो. रोहित्रांवरून जर शेतीपंपांसाठी वीज पुरवठा होत असेल, तर नवीन रोहित्र लागेपर्यंत शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रोहित्र चोरीच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. तांब्याचा भाव सध्या १ हजार रुपये किलोग्रॅम आहे. १०० किलोव्होल्ट क्षमतेच्या रोहित्रामध्ये सुमारे ८० ते ९० किलो तांब्याची तार आणि २०० लिटर इन्सुलेटिव्ह ऑईल असते. चोरटय़ांना तांबे विकून वीस ते तीस हजार रुपये मिळतात. रोहित्रांना कुठलेही संरक्षण नसल्याने चोरीचे प्रकार वाढले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 5th Aug 2014 रोजी प्रकाशित
चोरटय़ांचा ‘महावितरण’ला ‘शॉक’, २ वर्षांत ७४ रोहित्रांची चोरी
वीज वितरण व्यवस्थेत महत्वाचे माध्यम ठरणाऱ्या रोहित्रांच्या (ट्रान्सफॉर्मर्स) चोरीच्या घटना वाढू लागल्याने महावितरण कंपनीला घाम फुटला असून गेल्या दोन वर्षांत पश्चिम विदर्भातून लाखो रुपये किमतीचे तब्बल ७४ रोहित्रे चोरीला गेले आहेत.
First published on: 05-08-2014 at 02:28 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran worry over increase in transformers theft case