जिल्ह्य़ात ७०० कोटींपेक्षा अधिक थकबाकी कशी वसूल करायची, हा प्रश्न महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांपुढे आहे. शेतीपंपाच्या थकबाकीचे प्रमाण मोठे असले, तरी ग्रामपंचायती व नगरपालिकांकडील पाणीपुरवठा, तसेच पथदिव्यांच्या बिलांची थकबाकीही जवळपास ३५ कोटी रुपये आहे.
जिल्ह्य़ात जवळपास २ लाख ७३ हजार वीजग्राहक आहेत. पैकी १ लाख ५४ हजार घरगुती ग्राहक आहेत. घरगुती ग्राहकांकडील थकबाकी ४० कोटींपेक्षा अधिक आहे. दहा हजारांपेक्षा अधिक व्यापारी ग्राहकांकडील थकबाकी जवळपास ५ कोटी रुपये आहे. तीन हजार ७९० औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकी ३ कोटींपेक्षा अधिक आहे. एक लाख १६ हजारांपेक्षा अधिक शेतीपंपधारकांकडील थकबाकी ५२५ कोटींपेक्षा अधिक आहे. पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या थकबाकीची वसुली करण्याचा प्रश्नही आहे.
गाव व शहर पातळीवरील ८६२ सार्वजनिक पाणीयोजनांना महावितरणने वीज जोडण्या दिल्या आहेत. त्यांच्याकडील थकबाकी १० कोटींच्या आसपास आहे. ग्रामपंचायती व नगरपालिकांच्या पथदिव्यांना दिलेल्या १ हजार ३५८ जोडण्यांच्या थकबाकीपोटीही कोटय़वधींचे येणे बाकी आहे. थकबाकीमुळे जालना शहरातील पथदिव्यांची वीज मागील सव्वा वर्षांपासून खंडित आहे. पाणीयोजना व पथदिव्यांची वीज खंडित करण्याचे काम नेहमीचाच भाग झाला आहे.
महावितरणचे जिल्ह्य़ात २ विभाग असून पहिल्या विभागात जालना, बदनापूर, जाफराबाद, भोकरदन तालुके येतात. दुसऱ्या विभागात अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा तालुक्यांचा समावेश आहे. पहिल्या विभागातील थकबाकीचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्य़ात वीजगळती थांबविण्याचे मोठे आव्हान महावितरणसमोर आहे. जिल्ह्य़ात एकूण ८६ फीडर आहेत. पैकी २८ म्हणजे एक तृतीयांश फीडरवरील वीजगळती ८० टक्क्य़ांपेक्षा अधिक आहे.