कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून संजय मंडलिक निवडणूक लढवत आहेत. मंडलिक यांनी दोन दिवसांपूर्वीच महाराजांचा राजहट्ट कोल्हापूरकर पुरविणार नाहीत, अशी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा कोल्हापूरचा जुना वाद उकरून काढला आहे. आताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आणि ही कोल्हापूरची जनता खरी वारसदार आहे, असे विधान संजय मंडलिक यांनी केले आहे. या विधानावरून आता वाद निर्माण झाला असून काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

चंदगड तालुक्यातील नेसरी येथील जाहीर सभेमध्ये बोलत असताना मंडलिक यांनी ही टीका केली. तसेच माझे वडील सदाशिवराव मंडलिक हे खऱ्या अर्थाने पुरोगामी होते, त्यांनी पुरोगामी विचार जोपासले, असेही मंडलिक म्हणाले.

उमेदवार संजय मंडलिक यांनी अपमानास्पद वक्तव्य केले असल्याचे सतेज पाटील म्हणाले. शाहू महाराज यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्यावर कुणीही वैयक्तिक टीका करणार नाही, असे वर्तमानपत्रातून सांगितले होते. पण संजय मंडलिक यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आपला मोठा मताधिक्याने पराभव दिसत असल्यामुळे मंडलिक यांनी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहेत. त्यांनी माफी तर मागितलीच पाहीजे, पण या वक्तव्याबद्दल कोल्हापूरकर जनता निवडणुकीत त्यांना धडा शिकवेल. मंडलिक यांना कोल्हापूरी बाणा दाखविण्यात येईल, असे प्रत्युत्तर सतेज पाटील यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय मंडलिक यांना पराभव समोर दिसत असल्यामुळे ते निवडणूक वेगळ्या दिशेला घेऊन जात आहेत. मंडलिक यांनी कुस्ती करावी, त्याला कुणाची हरकत नाही. पण खालच्या पातळीची कुस्ती करू नये. महाराजांबद्दल वैयक्तिक टीका-टिप्पणी करणार नाही, हे सार्वजनिकरित्या जाहीर करूनही तुम्ही वैयक्तिक टिप्पणी का करत आहाता? असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला.