प्रभागाचे अनुकूल आरक्षण पडले की जल्लोष अन् मनाविरुद्ध आरक्षण पडले की हळूच काढता पाय घेतला जायचा.. हे चित्र होते शुक्रवारी महापालिका निवडणूक आरक्षण सोडत प्रक्रियेवेळचे.  आगामी निवडणुकीनंतर सभागृहात महिला राज येण्याची चुणूक आरक्षण सोडत प्रक्रियेतून दिसून आली. महिलांचा वरचष्मा राहणार असल्याने निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या अनेकांचा हिरेमोड झाला. तर काही प्रमुखांनी निवडणुकीत घरच्या कारभारणीला उतरवण्याचा निर्णय जागीच घेतला.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या तीन महिन्यांत होत आहे. महापालिकेसाठी एकंदरित ८१ प्रभाग असून त्यातील सर्वाधिक ४१ प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ११ जागा असून ६ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. इतर मागासवर्गीयांसाठी २२ जागा आरक्षित असून त्यातील निम्म्या महिलांसाठी आरक्षित आहेत. तर खुल्या प्रवर्गासाठी ४८ जागा असून त्यातील निम्म्या महिलांसाठी आरक्षित आहेत.
महिलांसाठी निम्म्या जागा आरक्षित असल्याची कल्पना इच्छुकांना अगोदरच आली होती. पण कोणत्या प्रभागात महिलांसाठी आरक्षण आहे याची निश्चित कल्पना नसल्याने शुक्रवारी अनेक इच्छुक धडधडत्या मनानेच रमणमळ्यातील बहुउद्देशीय सभागृहात पोहोचले. आयुक्त पी.शिवशंकर यांनी सहायक आयुक्तांच्या सहकार्याने चिठ्ठय़ा टाकून प्रभागाचे आरक्षण केले. याकरिता महापालिकेच्या न्यू पॅलेस (शाळा क्र.१५) मधील पाचवीतील ५ विद्यार्थी व विद्यार्थिनींना खास पाचारण केले होते. या विद्यार्थ्यांनीच आरक्षित प्रभागाच्या चिठ्ठय़ा उचलून राजकारण्यांचे भवितव्य उघड केले. तब्बल तीन तास प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया सुरू होती. विद्यमान सभागृहापेक्षा नव्या सभागृहात पाच नगरसेवक अधिक निवडून येणार आहेत.
कारभा-यांना धक्का
प्रभाग रचना व आरक्षणात बदल झाल्यामुळे महापालिकेतील अनेक प्रमुखांना विद्यमान प्रभागात मुकावे लागले. त्यांना शेजारच्या सुरक्षित मतदार संघाकडे लक्ष द्यावे लागणार आहे वा घरातील महिलांना निवडणुकीच्या िरगणात उतरवावे लागणार आहे. या प्रमुखामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू लाटकर, काँग्रेसचे गटनेता चंद्रकांत घाटगे, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, काँग्रेसचे उपमहापौर मोहन गोंजारे, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव (जनसुराज्य) तसेच नगरीचे महापौरपद भूषविलेल्या कांचन कवाळे व कादंबरी कवाळे यांचा समावेश आहे. महिलांचा टक्का वाढत असताना कवाळे सासू व स्नुषा मात्र बदलत्या प्रभाग रचनेमुळे नव्या सभागृहात असणार का या विषयी साशंकता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahilaraj in kolhapur
First published on: 01-08-2015 at 04:00 IST