प्रल्हाद बोरसे

करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे स्थानिक रुग्णालयांवर ताण पडू लागल्याने मालेगावच्या रुग्णांना उपचारासाठी जेव्हा नाशिक, धुळे येथे हलविण्याची चाचपणी सुरू झाली. त्यावेळी या दोन्ही ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी प्रखर विरोध केल्याने मालेगावच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. दोन महिन्यांनंतर करोना उद्रेकावर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने ‘मालेगाव प्रारूप’ राज्यभर चर्चेत आले. दुसरीकडे, नाशिक आणि धुळे येथील रुग्ण संख्येत आता वाढ होत आहे. अशा स्थितीत करोना उपचार व्यवस्थापनाचा अनुभव गाठीशी असलेल्या मालेगावकरांनी नाशिक आणि धुळे येथील रुग्णांना उपचार करण्यासाठी यावे असे नमूद केले. ज्या नाशिक, धुळ्याने आपल्या रुग्णांना नाकारले, तेथील रुग्णांवर उपचार करण्याची तयारी दाखविण्याचा मालेगावकरांनी मनाचा मोठेपणा दाखविला आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात मालेगावात करोना रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दिवसागणिक वाढत जाणारी रुग्णसंख्या चक्रावणारी होती. शहरातील मृतांची संख्या अडीच पटीने वाढल्याने सर्वानीच धास्ती घेतली. बहुसंख्य खासगी रुग्णालये बंद असल्याने आणि महापालिकेने सुरू केलेल्या कोविड रुग्णालयांवर उपचाराचा ताण पडत असल्याने अत्यावश्यक रुग्णांना पुढील उपचारासाठी धुळे आणि नाशिक येथे हलविण्याचा पर्याय पुढे आला. त्यानुसार सुरुवातीला काही रुग्णांना या दोन्ही ठिकाणी दाखलही करण्यात आले. परंतु, मालेगावच्या रुग्णांमुळे संसर्गाचा धोका उद्भवू शकतो या भीतीमुळे धुळे, नाशिक येथील लोकप्रतिनिधींनी मालेगावच्या रुग्णांना उपचारासाठी येऊ  देण्यास विरोध सुरू केला. एरव्ही मालेगावच्या गंभीर रुग्णांना अधिकच्या उपचारासाठी धुळे किंवा नाशिक येथे कायमच नेले जाते. परंतु, करोना संकटकाळात या दोन्ही ठिकाणी रुग्ण येऊ  देण्यास विरोध झाल्याने मालेगावकरांच्या अडचणी वाढल्या होत्या.

लोकप्रतिनिधींचा विरोध गंभीर

मालेगावच्या रुग्णांना धुळे येथे उपचारासाठी येऊ  देण्यास विरोध करणाऱ्यांमध्ये धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे हे अग्रभागी होते. वास्तविक कोणत्याही रुग्णाला उपचारास विरोध होणे हे गैरच. त्यातही डॉ. भामरे हे प्रतिनिधित्व करत असलेल्या लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य़ या दोन्ही विधानसभा क्षेत्रांचाही अंतर्भाव होत असल्याने त्यांच्याकरवी झालेला विरोध हा आणखी धक्कादायक होता. नंतर या संदर्भात त्यांनी केलेली सारवासारव तर गंभीर होती. मालेगाव मध्यमधील लोक अंतर नियमनाची शिस्त पाळत नसल्याने त्यांना आपला विरोध आहे. मालेगाव बाह्य़ची जनता तर आपल्यासाठी जीव की प्राण आहे, अशा आशयाचे विधान त्यांनी केले होते. एखादा लोकप्रतिनिधी अशाप्रकारे दुजाभाव कसा करू शकतो, असा प्रश्न यानिमित्ताने मालेगावकर विचारत आहेत. मालेगाव मध्य विधानसभा क्षेत्र हे मुस्लीमबहुल आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला जेमतेम पाच हजार मतांचा टप्पाही तेथे गाठता आला नव्हता. हा संदर्भ देत भामरेंचा विरोध हा राजकीय आकसापोटी असल्याची टीकाही केली जात आहे.

मागील आठवडय़ात महापालिकेने येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत डॉक्टर भामरे हे अचानक उपस्थित झाल्याने त्यांच्यावरील मालेगावकरांची खदखद व्यक्त झाली. काँग्रेसच्या महापौर ताहेरा शेख आणि त्यांचे पती माजी आमदार शेख रशीद यांनी भामरे यांच्या वादग्रस्त विधानांचा निषेध करत या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला होता. धुळ्याप्रमाणे मालेगावच्या रुग्णांना नाशिकमध्येही येण्यास तेथील लोकप्रतिनिधींकरवी विरोध झाला होता. दुर्दैवाने हा विरोध करणाऱ्यांमध्ये मालेगावशी संबंधितच व्यक्ती पुढे होती. मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील मूळ रहिवासी दिवंगत पोपटराव हिरे यांच्या स्नुषा भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी या संदर्भात केलेला विरोधही मालेगावकरांना असाच खटकत आहे. ‘तुम्ही मालेगावच्या सून आहात हे विसरू नका,’ असा सल्लाही तेव्हा त्यांना नेटकऱ्यांनी दिला होता.

आता मालेगावातील करोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. मृत्यूदर सामान्य स्तरावर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे सुमारे ५०० रुग्ण क्षमतेची उपचार व्यवस्था अस्तित्वात असताना सध्या ५० ते ६० पर्यंत शहरातील रुग्ण संख्या घटली आहे. दुसरीकडे धुळे आणि नाशिकमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, तेथील उपचार व्यवस्थेवरील ताण जर असह्य़ होत असेल आणि मालेगावात अस्तित्वात असलेल्या करोना रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची गरज वाटत असेल तर नाशिक, धुळ्याच्या रुग्णांना पाठवा, असे आवाहन मालेगावच्या महापौरांनी केले आहे. सध्या विविध समाज माध्यमांमध्येही असाच सूर उमटताना दिसत आहे. या आवाहनानुसार खरोखरच नाशिक, धुळे येथील रुग्ण मालेगावात येण्याची शक्यता नाही. परंतु, अडचणीत सापडलेल्या मालेगावकरांच्या मदतीसाठी पुढे येण्याऐवजी उपचारास विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींना ही चपराक नक्कीच आहे. यानिमित्ताने मालेगावकरांनी मानवतेचा वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसत आहे.