मालवण तालुक्यातील कर्ली खाडीतून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डंपरवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे २ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, चारही डंपर चालकांवर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर, संजय गांधी नायब तहसीलदार प्रिया हर्णे, मंडळ अधिकारी पीटर लोबो, ग्राम महसूल अधिकारी रवींद्र तारी आणि भरत शिंगनाथ यांच्या पथकाने केली. हे पथक देवली बोवलेकरवाडी खारबांध मार्गावर गस्त घालत असताना, त्यांना चार डंपर संशयास्पद स्थितीत दिसले. पथकाने त्यांना थांबवण्याचा इशारा केला, पण ते न थांबता पुढे गेले. अखेर सुमारे १०० मीटर अंतरावर हे डंपर थांबले.
​तपासणी केली असता, डंपर क्रमांक जीए ०४ टी १८६७ आणि जीए ०९ यू ४७०७ या दोन डंपरमधील चालकांनी सुमारे ५ ब्रास वाळू रस्त्यावर ओतून टाकल्याचे आढळले. उर्वरित दोन डंपर (क्रमांक जीए ०५ टी ६१३० आणि जीए ०४ टी २२७८) रिकामे होते. या चारही डंपर चालकांकडे वाळू वाहतुकीसाठी कोणतीही शासकीय परवानगी नव्हती.

​या प्रकरणी प्रथमेश बाळकृष्ण गावडे, गौरव अरुण नाईक, शेखर संतोष राठोड, आणि शंकर सुरेश भितये या चार डंपर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडळ अधिकारी पीटर लोबो यांनी याबाबत मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे. जप्त करण्यात आलेल्या चारही डंपरची एकूण किंमत २ कोटी २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

​दरम्यान, तहसीलदार वर्षा झालटे यांनी कर्ली व कालावल खाडीतील अनधिकृत बोटींवर मेरीटाईम बोर्डाने कारवाई करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात यापूर्वी आदेश देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.