कराड : ‘तुमच्या वडिलांच्या नावाची विमा पॉलिसी आहे. ती सोडवण्यासाठी पैसे भरा,’ अशी बतावणी करून, युवकाला तब्बल २५ लाख ५९ हजार ४७ रुपयांना फसवल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी कराड ग्रामीण पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवेक चौधरी, अरविंद मिश्रा आणि विजेंद्र आझाद (पूर्ण नाव माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत तर अजित सुभाष पवार (वय २९, रा. रेठरे खुर्द) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.

विवेक चौधरी यांचा अजित पवार या युवकास पहिल्यांदा संपर्क झाला, तेव्हा विवेकने तुमच्या वडिलांच्या नावाने एका मोठय़ा कंपनीत विमा पॉलिसी आहे. ती सोडविल्यास तुम्हाला मोठी रक्कम मिळणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल, असे अजितला सांगण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अरविंद मिश्रा व जितेंद्र आझाद यांनीही भ्रमणध्वनीवर संपर्क करून अजितला त्याची माहिती दिली.

काही रक्कम भरण्यास सांगितले. पाच फेब्रुवारी ते पाच मे २०२१ या चार महिन्यांत अजित पवारने थोडे-थोडे करत तब्बल २५ लाख ५९ हजारांची रक्कम त्या तिघांनी सांगितलेल्या खात्यात भरली. त्यानंतर मात्र त्या तिघांनाही त्याच्याशी संपर्क ठेवला नाही. टाळाटाळ होऊ लागली. यावर अजित पवार याला आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात आले. त्यामुळे त्यांनी सोमवारी रात्री कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी तिघांवर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.