scorecardresearch

नरभक्षक वाघिणीला वनविभागाने केले ठार, दहशत संपुष्टात

वाघिणीला ठार करण्यात आल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे

नरभक्षक वाघिणीला वनविभागाने केले ठार, दहशत संपुष्टात

यवतमाळ येथील पांढरकवडा भागात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात अखेर वन विभागाला यश आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या वाघिणीने धुमाकूळ घातला होता. टी१ या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी मागच्या दीड महिन्यापासून वन विभागाचे कसोशीचे प्रयत्न सुरु होते. अखेर शुक्रवारी रात्री वन विभागाच्या बचाव पथकाने या वाघिणीला ठार केलं. या वाघिणीने आत्तापर्यंत १४ जणांचा जीव घेतला.

या वाघिणीच्या दहशतीमुळे केळापूर, राळेगाव, कळंब या ठिकाणची शेतीची कामे ठप्प झाली होती. या तालुक्यांमध्ये वाघिणीनं धुमाकूळ घातला होता. पांढरकवडा वन विभागातील राळेगाव आणि पांढरकवडा या ठिकाणी या वाघिणीची सर्वात जास्त दहशत होती. लोणी, सराटी, खैरगाव, विहिरगाव, येडशी, मिरा, तेजनी या गावांमध्येही वाघिणीची चांगलीच दहशत होती. आता तिला ठार करण्यात आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

या वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. पाच शार्प शुटर, तीन मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचारी आणि खासगी कर्मचाऱ्यांची फौज या ठिकाणी होती. वाघिणीचा शोध घेण्यासाठी पॅरामिटर आणि इटालियन कुत्रेही आणण्यात आले होते. असे असले तरीही या वाघिणीला पकडण्यात आले नव्हते. अखेर तिचा शुक्रवारी खात्मा करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.