जालना : कपडे घेण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून सोबती असणाऱ्या झोपेत दगड घालून खून केल्याच्या आरोपावरून जालना जिल्ह्यातील आष्टी पोलिसांनी परभणी जिल्हयातील आडगाव दराडे (तालुका सेलू ) येथील एका आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला. लक्ष्मण गुलाबराव कदम असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
परतूर तालुक्यातील लिखित पिंपरी गावाच्या शिवारात लक्ष्मण कदम (३०) याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. मृतदेहाच्या जवळ रक्ताचे डाग असलेला वीस किलो वजनाचा दगड, देशी दारुच्या दोन रिकाम्या बाटल्या, दोन प्लॉटिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पाण्याची एक रिकामी बाटली सापडली होती. तपासात मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आष्टी पोलिसांनी परभणी जिल्हयातून आरोपीस अटक करण्यात आली.
पकडलेल्या आरोपीने मृत कदम याच्यासोबत आपण सेलू येथे एका बँकेत गेलो होतो. तेथे कदम याने त्याच्या पत्नीचा सोन्याचा दागिना ठेवून ३३ हजार रुपये घेतले. नंतर दोघांनी लिखित पिंपरी येथील एका शेतात दारू घेतली.त्या वेळीआपण कदम यास कपड्यासाठी पैसे मागितले. परंतु त्याने दिले नाहीत.
जुन्या भांडणाचा राग आणि कपड्यासाठी पैसे देत नाही म्हणून कदम झोपी गेल्यावर त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर त्याच्या खिशातील ३२ हजार ५०० रुपये काढून निघून गेलो. नंतर एका मठात जाऊन रक्ताचे डाग असलेले कपडे धुतले व पैसे बाथरूम मध्ये लपवून ठेवले, असे आरोपी दराडे याने तपासात सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी आरोपीकडून पैसे जप्त केले आहेत.