scorecardresearch

कोल्हापूर : धक्कादायक! मुलाच्या उपचारांचा खर्च परवडत नसल्याने पित्यानं ५ वर्षांच्या चिमुकल्याला नदीत फेकलं!

मुलाच्या उपचारांचा खर्च परवडत नसल्यामुळे ५ वर्षांच्या चिमुकल्याला पित्यानंच नदीत फेकल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे.

कोल्हापूर : धक्कादायक! मुलाच्या उपचारांचा खर्च परवडत नसल्याने पित्यानं ५ वर्षांच्या चिमुकल्याला नदीत फेकलं!
पंचगंगा नदी (संग्रहीत छायाचित्र)

आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी पैसे नसल्यामुळे पित्यानच पोटच्या मुलाला नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना कोल्हारपूरमध्ये घडली आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजी भागात ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी पित्याला अटक केली आहे. सिकंदर हुसेन मुल्ला असं ४८ वर्षीय पित्याचं नाव असून अफान सिकंदर मुल्ला असं नदीत फेकलेल्या ५ वर्षांच्या चिमुकल्याचं नाव आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस चौकशी करत आहेत. सिकंदरनं आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्याला पंचगंगा नदीत फेकल्याची माहिती दिली असून त्यानुसार मुलाचा शोध घेतला जात आहे.

अफानला फिट्सचा आजार

पाच वर्षांच्या अफानला फिट्स येण्याचा आजार आहे. सिकंदर हा मोलमजुरीचं काम करतो. शिवाय सिकंदर स्वत: दिव्यांग आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या कुटुंबात वाद सुरू आहेत. त्यातच दारूच्या नशेत तो अनेक वेळा घराबाहेरच असतो. त्याला एक दहा वर्षांची मुलगी आणि अफान अशी दोन मुले आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने औषधोपचाराच्या खर्चाच्या कारणावरून त्यांच्या घरी सतत वाद होत असत.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सिकंदर घराबाहेर होता. त्यामुळे घरी परतताच त्याच्या पत्नीने त्याला चांगलेच सुनावले. तसेच, अफानच्या औषधोपरांवरून देखील त्यांच्यात वाद झाला. त्याच्या इतर कुटुंबीयांनी देखील त्याला सुनावलं. त्यामुळे सिकंदरला संताप अनावर झाला.

रात्री घरी परतल्यानंतर दिली धक्कादायक कबुली!

संध्याकाळी संतापाच्या भरात मुलाला उपचारांसाठी नेतो असं सांगून सिकंदर ५ वर्षांच्या अफानला घेऊन गेला. पण रात्री उशिरा घरी आल्यानंतर त्याने मुलाला पंचगंगा नदीत फेकल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. हे ऐकून सिकंदरच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. या प्रकारानंतर सिकंदरची शिवाजी नगर पोलिसात तक्रार करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

अफानचा अजूनही शोध सुरू आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांत याच परिसरात अशा प्रकारे मुलांना फेकण्याची ही तिसरी घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man throw baby in panchganga river in kolhapur lack of money for treatment pmw