कर्जत: सहकार महर्षी रावसाहेब उर्फ बाळासाहेब जगताप पाटील सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी मंगेश जगताप यांची तर उपाध्यक्षपदी दादासाहेब खराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते.
कर्जत दूध संघाच्या संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर नूतन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षपदासाठी मंगेश जगताप तर उपाध्यक्षपदासाठी दादासाहेब खराडे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर गाडे यांनी या दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. संचालक काकासाहेब धांडे, शामराव काळे, बाळासाहेब निंबाळकर, अंकुश दळवी, रामजी पाटील, दत्तात्रय पाटील, शंकर देशमुख, दत्तात्रय तनपुरे, दादासाहेब निंबाळकर, शिवाजी काळे, बारकू काळे, शशिकला शेळके व छाया ढगे हे संचालक उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष जगताप व उपाध्यक्ष दादा खराडे यांचा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सत्कार केला. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे तालुका दूध संघ मोडकळीस आलेले असताना कर्जत तालुका दूध संघ ऊर्जेतावस्थेत आणण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्रयत्न चालवले आहेत. संघाच्या बहुसंख्य संचालकांनी राम शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारल्याने या घडामोडींचा परिणाम आगामी जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या निवडणुकीवर होणार आहे.
राम शिंदे यांची सभापती नियुक्ती झाल्यानंतर कर्जत- जामखेड मतदारसंघात राम शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्यामध्ये पुन्हा जोरदार कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. त्यातूनच कर्जत दूध संघ हा राम शिंदे यांच्या वर्चस्वाखाली आला आहे. काही दिवसांपूर्वी जामखेड तहसीलदारांची वर्षभरातच बदली झाल्याने रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर नाव न घेता आरोप केले होते.