Manikrao Kokate first reaction after he removed from Agriculture Minister portfolio : महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनावेळी सभागृहात माणिकराव कोकाटे मोबाइलवर ऑनलाइन रमी खेळत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्या या व्हिडीओनंतर विरोधकांनी सरकारविरोधात टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीखातं काढून घेण्यात आले असून दत्तात्रय भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषीखातं देण्यात आलं आहे. या खाते फेरबदलानंतर आता माणिकराव कोकाटे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे. या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल सुरू असणार आहे. दुसरीकडे दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आहेत. ते मोठे आणि जाणकार शेतकरी आहेत, त्यांच्याकडे हे खाते सोपवले आहे. त्यामुळे या खात्याला निश्चितपणे न्याय मिळेल. त्या खात्यात त्यांना गरज पडली आणि त्यांनी माझ्याकडे काही मदत मागितली तर मी १०० टक्के त्यांना मदत करेन,” असे मानकराव कोकाटे म्हणाले आहेत

“जे खातं माझ्याकडे देण्यात आले आहे, त्यामध्ये दत्ता मामा भरणे यांची काही गरज पडली तर मी त्यांचा सल्ला देखील घेईन आणि अतिशय उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करेन,” असे माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत.

कृषी खातं काढून घेतल्याबद्दल तुम्ही नाराज तर नाहीत ना? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधिंनी विचारला असता, “अजितबात नाही. आय अॅम व्हेरी हॅप्पी,” अशा शब्दात माणिकराव कोकाटे यांनी ते नाराज नसल्याचे स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीस काय म्हणाले?

माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलाच्या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की “जी काही घटना घडली त्यानंतर मोठा रोष होता, त्याबद्दल अजित पवार आणि एकनाथ शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे. त्यांचं खातं बदलेलं आहे आणि त्यांना दुसरं खातं दिलं आहे. कृषी खातं मामा भरणे यांना दिलं आहे.” या बदालसह अजून मंत्रिमंडळात काही बदल होतील का? याबद्दल विचारले असता फडणवीस यांनी “आत्तातरी दुसरा कुठला बदल होईल अशी चर्चा नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.