Manikrao Kokate On Rumours About His Dismissal From Ministry : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्ये आणि विधीमंडळाच्या अधिवेशनावेळी सभागृहात मोबाइलवर ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळताना दिसल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सभागृहाचं कामकाज चालू असताना कोकाटे मोबाइलवर रमी खेळत असल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर होत आहे. यासह विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या कृत्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, “मी आधी कृषीमंत्री कोकाटे यांच्याबरोबर समोरासमोर चर्चा करेन आणि त्यानंतर पुढील निर्णय घेईन.” दरम्यान, कोकाटे यांची कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच ते गुरुवारी (२४ जुलै) धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आहे. धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना कोकाटे म्हणाले, “मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. आता माझे कार्यकर्ते बोलतील.”
माणिकराव कोकाटे काय म्हणाले?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे दोन दिवसीय धुळे जिल्हा दौऱ्यावर असून गुरुवारी रात्री उशिरा त्यांचे शहरात कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना काही प्रश्न विचारले. मात्र, कोकाटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं. त्यांचा एक सहकारी म्हणाला, “चर्चा बरीच झाली आता कामं करू.” तरीदेखील अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारल्यावर कोकाटे म्हणाले, “मी माझी भूमिका कालच स्पष्ट केली आहे. आता येणाऱ्या काळात आमचे कार्यकर्तेच बोलतील.”
कृषीमंत्र्यांच्या व्हायरल व्हिडीओबाबत अजित पवारांची भूमिका काय?
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “कृषीमंत्री कोकाटे यांच्या बाबतीत मला जी माहिती मिळाली ती घटना सभागृहाच्या आत घडलेली आहे. आता हे तुम्हालाही माहिती आहे की विधानभवनाचा परिसर विधानसभेचे अध्यक्ष व विधानपरिषदेच्या सभापतींच्या अखत्यारीत येतो. कृषीमंत्र्यांच्या व्हिडीओबाबत विधानसभा अध्यक्षांनी आणि विधानपरिषदेच्या सभापतींनी देखील चौकशी सुरू केली आहे. माणिकराव कोकाटे मला अद्याप भेटलेले नाहीत. सोमवारी माझी व त्यांची भेट होईल. तेव्हा मी त्या कथित व्हिडीओबाबत त्यांच्याशी बोलेन.”