Manikrao Kokate on 1 Rupee Crop Insurance : विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात लक्षवेधी चालू असताना कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते माणिकराव कोकाटे हे त्यांच्या बाकावर बसून मोबाइलवर ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावरून कोकाटेंवर टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांनी आज (२२ जुलै) नाशिक येथे पत्रकार परिषद घेत सर्व आरोपांवर स्पष्टीकरण दिलं.
पत्रकार परिषदेत बोलताना माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले. तसेच राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं. यासह कोकाटे यांनी एका जुन्या वादग्रस्त वक्तव्यावर खुलासा करत असताना आणखी एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो.
“भिकारीही एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना विमा दिला”
“हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. परंतु, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला. काही लोकांनी या योजनेचा गैरवापर केला”, असं वक्तव्य कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राज्यभरातून कोकाटेंविरोधात आंदोलनं झाली. तो वाद शमल्यानंतर सभागृहातील रमीच्या डावामुळे कोकाटे नव्या वादात अडकले. आता त्यावर स्पष्टीकरण देताना कोकाटे यांनी केलेल्या नव्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
शासन भिकारी आहे, शेतकरी नाही : कोकाटे
माणिकराव कोकाटे म्हणाले, “शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतं. पण शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही. सरकार पैसे घेतं. म्हणजे भिकारी कोण? शासन भिकारी आहे, शेतकरी नाही. परंतु, माझ्या वक्तव्याचा उलटा अर्थ काढण्यात आला. एक रुपया फार मोठी किंमत नाही. परंतु, या एक रुपयाच्या विम्यामुळे महाराष्ट्रात पाच ते साडेपाच लाख बोगस अर्ज प्राप्त झाले. माझ्याच कार्यकाळात ही घटना घढली. त्यानंतर आम्ही तात्काळ ते बोगस अर्ज रद्द केले आणि काही नव्या घोषणा केल्या.”
फडणवीसांची नाराजी
कोकाटेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मी काही त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही. परंतु, त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर ते चुकीचं आहे. कुठल्याही मंत्र्याने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. पिकविम्याबाबत अतिशय चुकीची माहिती पसरली गेली आहे.”