येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक मंडळातर्फे यंदाचे आदर्श महिला पुरस्कार मंजिरी लिमये, डॉ. जयश्री जोग आणि स्वाती राजवाडे यांना जाहीर झाले आहेत.
मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी आणि कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांनी मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांबाबत माहिती देताना सांगितले की, नगरपालिकेच्या शाळेतील शिक्षिका लिमये, संगमेश्वरच्या डॉ. जोग आणि देवरुखच्या माजी नगराध्यक्ष राजवाडे यांची कै. सुधा वसंत बडे आदर्श महिला पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. चिपळूणचे पत्रकार मकरंद भागवत आणि वेलदूर (गुहागर) येथील किशोर पडय़ाळ यांना स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पाच हजार रुपये रोख व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मंडळातर्फे गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेला बाजीराव-मस्तानीपुत्र समशेरबहाद्दर पुरस्कार यंदा तासगाव, सांगली येथील दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेतील विद्यार्थी अक्षयकुमार कावळे याला देण्यात येणार आहे. साडेसात हजार रुपये रोख आणि प्रशस्तिपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मंडळाच्या कै. ल. वि. केळकर वसतिगृहातील आदर्श विद्यार्थी पुरस्कार अनिरुद्ध भिडे याला देण्यात येणार असून कीर्ती करकरे, स्वरदा महाबळ, मानसी पाथरे, रुची दळी, ओमकार जावडेकर, अक्षय कांबळे, नचिकेत देसाई आणि पूनम पाष्टे यांना लोकमान्य टिळक पारितोषिक पुरस्कार दिले जाणार आहेत. येत्या २७ मार्चला दुपारी ४ वाजता मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचाही गौरव केला जाणार आहे.