राहाता: उत्तर व दक्षिण भारतला जोडणारा मनमाड – अहिल्यानगर हा एकमेव जवळचा महत्त्वाचा महामार्ग आहे. शिर्डी व शनि शिंगणापूर ही दोन महत्त्वाची धार्मिक देवस्थाने याच मार्गावर आहेत. प्रवासी, पर्यटक व अवजड वाहने यांची मोठी गर्दी असते. या रस्त्याची गेल्या २० वर्षांपासून झालेली दुरवस्था व कोल्हार येथील प्रवरा नदीवर समांतर पूल नसल्याने या पुलावर सुटीच्या दिवशी वाहतूक तासन् तास खोळंबलेली असते. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. या रस्त्याचे काम व प्रवरा नदीवर समांतर पुलाचे काम लवकर मार्गी न लागल्यास व्यापाऱ्यांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा कोल्हार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर खर्डे यांनी दिला आहे.

गेल्या वीस वर्षांपासून अहिल्यानगर – मनमाड महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरूच आहे. अद्याप ते पूर्ण होत नाही. या वीस वर्षांच्या कालावधीत अनेक नागरिकांना प्राण गमवावा लागला. सोबत प्रवरा नदीवरील पुलाची स्थिती अत्यंत दयनीय व धोकादायक बनली आहे. या पुलावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात, तसेच वाहने वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने वाहतूक ठप्प होऊन वाहतूक कोंडी होते.

कोल्हारला येणारे भाविक, रुग्ण, विद्यार्थी, ग्राहकांचे प्रचंड हाल होतात. दोन वर्षांपूर्वी समांतर पुलाच्या कामास प्रारंभ झाला होता, मात्र ते काम अद्यापपर्यंत सुरू झालेले नाही. या संदर्भात अनेक वेळा शासकीय पातळीवर निवेदन देऊन पाठपुरावा करूनदेखील कुठलीच सुधारणा झाली नाही.

महामार्गाचे प्रकल्प संचालक दिनेश स्वामी यांना दिलेल्या निवेदनात कोल्हार ग्रामपंचायतीने म्हटले की, प्रवरा नदीवरील पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती आणि नवीन पुलाचे काम त्वरित सुरू करावे. अन्यथा परिसरातील ग्रामस्थ आंदोलन उभारतील. नगर-मनमाड रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांच्या मनात शंका आहेत. त्यांचे निरसन करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याने कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीत उपस्थित राहावे. निवेदनावर कोल्हारच्या सरपंच निवेदिता बोरुडे व ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत चौरे यांच्या सह्या आहेत.

१५ दिवसांत पुलाची व्यवस्थित डागडुजी

अहिल्यानगर-मनमाड रस्त्याचे काम येत्या १५ दिवसांत सुरू करण्यात येईल, तसेच वाहतूक सुरळीत होण्यासाठी कोल्हार येथील प्रवरा नदीवर असलेल्या पुलाची डागडुजी व्यवस्थित करण्यात येईल. रस्त्यांच्या सर्व समस्या सोडविण्याचा आपला प्रयत्न आहे. – दिनेश स्वामी, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग

जनहित याचिका दाखल करणार

संबंधित यंत्रणा व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी लवकर काम सुरू केले नाही, तर आंदोलन उभारण्यात येईल. या रस्त्यावरील अपघातातील मृत्यूस जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. रस्त्याच्या कामासाठी आणि प्रवरा नदीवरील पूल होण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार आहोत. -ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील, माजी सरपंच, कोल्हार