|| संतोष मासोळे

जवळपास १९ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मनमाड ते इंदूर या ३६२ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली. या नव्या रेल्वे मार्गामुळे धुळ्यासह नाशिक, जळगाव हे भाग इंदूरबरोबर दक्षिण-उत्तर आणि पूर्व-पश्चिमेशी जोडले जातील.

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाला असंख्य आंदोलनांचा इतिहास लाभला आहे. या रेल्वे मार्गाची मागणी अडीच दशकांपूर्वी सुरू झाली. खंडेराव बाजार मित्र मंडळाने खंडेराव बाजार रेल्वे संघर्ष समिती तयार करुन मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाची मागणी करीत आंदोलने केली. त्यास विविध राजकीय, सामाजिक संघटनांनीदेखील आपल्या परिने निवेदने, पत्र व्यवहार करीत पाठबळ दिले. धुळ्याचे आमदार म्हणून १९९९ मध्ये पहिल्यांदा निवडून आल्यावर अनिल गोटे यांनी हा प्रश्न हाती घेतला आणि तत्कालिन भाजपप्रणित केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. तत्कालिन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनाही निवेदन दिले. त्या काळात रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षणाचा निर्णय झाला. पुढे जनविकास परिषदेने हा विषय लावून धरला. या दोन दशकात असा कोणताही रेल्वेमंत्री नसेल ज्यांच्यासमोर हा विषय मांडला गेला नाही. आमदार गोटे यांनी २००७ मध्ये या प्रश्नावर मोठे आंदोलन केले. तेव्हा कुठे निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने या रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्राच्या वाटेचा निधी देण्याची तयारी दाखवली. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिल्लीत पोहोचल्यानंतर पाठपुरावा सुरू केला. या मार्गाचे श्रेय घेण्यावरून भाजपचे विद्यमान आमदार गोटे आणि डॉ. भामरे यांच्यात राजकीय लढाई सुरू आहे. असा मोठा पल्ला पार करत या रेल्वेमार्गाला अखेर मुहूर्त सापडला आहे.

दोन्ही राज्यातील अविकसित भाग या रेल्वे मार्गाने देशातील अन्य भागांशी रेल्वे मार्गाने जोडले जाण्यास मदत होणार आहे. एकूण ३६२ किलोमीटर लांबीचा मनमाड-इंदूर हा रेल्वेमार्ग आहे. त्यापैकी महाराष्ट्रात १९२ किलोमीटर अंतराचा मार्ग असेल. सातपुडा पर्वतरांगा असल्याने या मार्गावर दोन बोगदे असणार आहेत. पहिला बोगदा १९६ ते २०५ किलोमीटर दरम्यान नऊ  किलोमीटरचा असेल. दुसरा बोगदा मालवण-सेंधवादरम्यान पाच किलोमीटरचा असेल. या मार्गावरील ४० स्थानकांपैकी २५ स्थानके महाराष्ट्राच्या हद्दीत आकारास येणार आहेत.

वैशिष्टय़े

  • एकूण लांबी ३६२ किलोमीटर
  • मनमाड-इंदूर रेल्वेमार्गावर ४० स्थानके, दोन बोगदे मंजूर
  • महाराष्ट्रातील स्थानके (कंसात किलोमीटर)

मनमाड (०), आष्टे (८.५), कुंडलगाव (१२.२५), चौंडी (१८), वऱ्हाणे (२८), नगाव (३५), मालेगाव (४२), चिखलओहोळ (५१), झोडगे (५८), आर्वी (६८), हेंद्रूण (७६), बोरविहीर (८४), मोहाडी (९५), धुळे (९८), फागणे (१००), निमखेडी (११०), धमाणे (११६), कापडणे (११९), सोनगीर (१२५), वाघाडी (१३०), माळीच (१३६), नरडाणा (१३८), दभाषी (१४७), शिरपूर (१५७), हाडाखेड (१७२), पळासनेर (१८६).

मध्य प्रदेशातील स्थानके

सेंधवा (२१३), ओझर (२२८), जुलवानिया (२३४), लिंगवा (२४४), खजुरी (२५०), कुंदामाल (२५७), मालवण-ठिकरी (२६४), निमराणी (२७१), धामनोद (२८३), काकरदा (२९६), नयापूरा (३२०), केलोद (३२७), महू (३३९)