scorecardresearch

Premium

“पश्चिम महाराष्ट्राने तुमचं काय घोडं मारलं?”; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे संतापले, म्हणाले…

पृथ्वीराज चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारलं आहे? असा प्रश्न विचारला. यावर आता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Jarange Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे आक्रमक झाले. (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर सडकून टीका केली. तसेच मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं असेल, तर पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारलं आहे? असा प्रश्न विचारला. यावर आता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सोमवारी (११ सप्टेंबर) जालन्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. त्याचा उपोषणाचा १४ वा दिवस आहे.

मनोज जरांगे म्हणाले, “लका मला तर काय बोलावं कळतच नाही. मी महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देतो म्हणतो आहे. पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्याकडे निजाम होता की नव्हता मला काय माहिती. त्यांनी ८-१५ दिवस निजाम पश्चिम महाराष्ट्रात घेऊन जायचा होता. निजाम इकडे होता का, तिकडे होता का, घोडं मारलं का असं काहीही काढतात.”

Sanjay Raut Slams BJP
“महाराष्ट्रात भाजपाच्या राजकीय कुंटणखान्याचा विस्तार, पण…”, संजय राऊत यांची टोलेबाजी
Sharad pawar and ashok chavan
राष्ट्रवादी फुटण्याआधीच अशोक चव्हाण भाजपात जाणार होते? सात महिन्यांपूर्वीच ‘देवगिरी’वर खलबतं; शरद पवार गटाचा दावा
uddhav thackeray eknath shinde hemant soren
“राज्यातल्या मिंध्या आमदारांनी या आदिवासी आमदारांच्या पायांचे…”, सत्ताधाऱ्यांवर ठाकरे गटाचा हल्लाबोल!
Chhagan-Bhujbal-1
“सर्व नाभिक आणि मराठा समाजाला…”, ‘त्या’ वक्तव्यावरून छगन भुजबळांचं स्पष्टीकरण

“आम्ही तुम्हाला टीव्ही घेऊन देऊ का?”

“आम्ही त्यांचं घोडं मारलं आहे का? आम्ही आरक्षण मागितलं आहे, तर मागू द्या ना. आम्हीही तुमचेच आहे ना. कुणाचं तरी एकाचं कल्याण होतच राहील, ते होऊ द्या. तरी मी जाहीरपणे म्हणतो आहे की, सरसकट महाराष्ट्रातील मराठ्यांनाआरक्षण द्या. हे बातम्या पाहत नाही का? त्यांच्याकडे टीव्ही नाही का? आम्ही टीव्ही घेऊन देऊ का?” असा प्रश्न मनोज जरांगे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारला.

“हे असं बोलणं चांगलं नाही”

मनोज जरांगे पुढे म्हणाले, “मी असं बोललो की, परत म्हणतात असं का बोलतो. तुमच्याकडे निजाम होता आणि आमच्याकडे नव्हता. आमच्याकडे निजाम का आले नाहीत, असं ते म्हणत आहेत. आमच्याकडे इंग्रज का आले नाही, तर मग त्यांनी आमच्याकडे ८-१५ दिवस इंग्रज लोटून द्यायचे होते. हे असं बोलणं चांगलं नाही.”

“पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात येत नाही का?”

“मी संपूर्ण महाराष्ट्राविषयी बोलतो आहे, मग पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात येत नाही का? सरसकट महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षणाची मागणी करतो आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र या महाराष्ट्रात असणारच ना. मी जीव जाळतोय, मी सगळ्यांना आरक्षण देणार आहे. मी एकही विभाग सोडणार नाही. मी कोरडा पडायला लागलोय बाबा. त्यांनी तिकडं ताकद लावावी, माझ्याकडे लावू नये,” असं मत मनोज जरांगेंनी व्यक्त केलं.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते?

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकदम चुकीचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे दोन भाग केले आहेत. एक ज्यांच्याकडे निजामकालीन कागदपत्रं आहेत त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचं आणि दुसरं म्हणजे जे गरीब आहेत ज्यांच्याकडे कागदपत्रं नाहीत, राहण्यासाठी ज्यांच्याकडे घरही नाही ते पुरावे कसे सांभाळणार? त्यामुळे त्यांना हे आरक्षण मिळणार नाही.”

हेही वाचा : Video: “मी हात जोडून आवाहन करतो की…”; पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंची मराठा समाजाला साद, म्हणाले…

“माझा त्यांना सवाल आहे की, मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं असेल, तर पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारलं आहे? निजामकालीन कागदपत्रं तुम्ही ग्राह्य धरत आहात, पण शाहू महाराजांच्या काळातले दाखले ग्राह्य धरत नाही हा कुठला न्याय? दिल्लीतही भाजपाचं सरकार आहे आणि महाराष्ट्रातही भाजपाचं सरकार आहे त्यांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे,” अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manoj jarange answer prithviraj chavan over west maharashtra maratha reservation pbs

First published on: 11-09-2023 at 14:02 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×