अहिल्यानगर : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या ‘मतचोरी’च्या आरोपांवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संभ्रम निर्माण झाला असल्याचे सांगितले. जरांगे म्हणाले, मतचोरी झाल्याचे वाटत नाही, पण लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत धडाधड पडले कसे, हा प्रश्नच आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टला मुंबईत मोर्चा नेण्याचे जाहीर केले आहे. त्याच्या नियोजनासाठी जरांगे पाटील आज, रविवारी नगरमध्ये होते. यावेळी त्यांनी मराठा समाजातील विविध संघटना व संस्था पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार संग्राम जगताप यांनीही त्यांची भेट घेतली.

राहुल गांधी यांनी भाजपवर निवडणुकीत मतचोरीचा आरोप केला. शरद पवार यांनीही त्याला पुष्टी दिली आहे, याकडे लक्ष वेधले असता जरांगे पाटील म्हणाले, मतचोरी झाल्याचे मला वाटत नाही. परंतु लोकसभेला धडाधड निवडून आलेले विधानसभेला पडले कसे, हा प्रश्नच आहे. पडणारे तीन ते चार हजार मतांनी पडले. मात्र त्यांनी सुद्धा आता खचून न जाता नव्याने उभे राहावे.

मराठा आरक्षण आंदोलनाला सत्ताधारी पक्षातील मराठ्यांचाही आतून पाठिंबा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची देयके अडवून ठेवतात, त्यामुळे ते पाठिंबा देण्यासाठी उघड होत नाहीत. पण त्यांचे कुटुंबीय व समर्थक २९ ऑगस्टला मुंबईत आमच्याबरोबर असतील, असा दावाही त्यांनी केला. जरांगे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

शरद पवारांच्या मंडल यात्रेवर बोलण्यास नकार

शरद पवार यांनी सुरू केलेल्या मंडल यात्रेसंदर्भात बोलताना जरांगे पाटील म्हणाले, त्यांच्या या आंदोलनाबाबत मला फारशी माहिती नाही, त्यामुळे मी बोलणार नाही. परंतु कोणी जातीयवाद करत असेल, ओबीसी व मराठ्यांमध्ये भांडण लावत असेल तर त्याला मी सोडणार नाही. असे भांडण लावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत. त्यांना दंगली घडवायच्या आहेत. दंगली घडल्या तर त्याचा डाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लागेल.

जातगणनेचा उद्देश अद्याप स्पष्ट नाही

पुढील वर्षापासून सुरू होणाऱ्या जातगणनेचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. जातगणना ही अंदाजपत्रकातील जातनिहाय आर्थिक तरतुदीसाठी आहे, की आरक्षणासाठी, हे केंद्र सरकारने जाहीर केले नाही. मात्र अधिक लोकसंख्या म्हणून आरक्षणाचा फायदा असा विषय होऊ शकत नाही. कारण जात मागास ठरवण्यासाठी त्यासाठी वेगवेगळे निकष आहेत. आमच्या आरक्षणाला मंत्री छगन भुजबळ विरोध करत असले तरी त्यांच्या समता परिषदेने मला नगरमध्ये पाठिंबा दिला आहे. त्यांचे सगेसोयरेही मला भेटत आहेत, असा दावा जरांगे यांनी केला.