मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. आज जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंची जाहीर सभा होणार आहे. राज्यभरातून असंख्य लोक या सभेसाठी जात आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. १०० एकरात होणाऱ्या सभेसाठी सात ते आठ कोटी रुपये खर्च येतो, एवढे पैसे कुठून आले? असा सवाल छगन भुजबळांनी विचारला.

यावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच आजपासून पुढील १० दिवसांत काहीही झालं तरी आम्हाला आरक्षण पाहिजे, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आजपासून सरकारच्या हातात फक्त दहा दिवस आहेत. आम्हाला दहा दिवसांनी आरक्षण पाहिजे. कारण आरक्षण आमच्या हक्काचं आहे. ही वेदना आहे, सभा नाही. प्रचंड पैसा घालवूनही मराठा समाजातील मुलं सुशिक्षित बेकार म्हणून जगायला लागले आहेत. प्रचंड शिकूनही मराठा समाजाच्या मुलांचा नोकरीतला टक्का कमी झाला आहे.”

हेही वाचा- “पाच हजार पुरावे पुरेसे नाहीत मग आता काय ट्रकभर…”, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सवाल

छगन भुजबळ तुमच्यावर टीका-टिप्पणी करतायत पण एकनाथ शिंदे तुमच्या संपर्कात होते, सरकारकडून काही प्रतिसाद मिळाला आहे का? असा सवाल विचारला असता मनोज जरांगे म्हणाले, “हे दोघं एकाच बाजारातले आहेत. त्यामुळे मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही. ते काय आहेत? हे सगळ्या राज्याला माहीत आहे. भुजबळांचा विषय तर चिल्लर झाला आहे. ते बारीक लेकरासारखं काहीही बोलायला लागले आहेत. बहुतेक त्यांचा आणि त्यांच्या वयाचा आता ताळमेळ बसत नाही. ते आता बरळल्यासारखं करायला लागले आहेत.”

हेही वाचा- “मंत्रालयाचे सहा मजले सुधारले तर अख्खा महाराष्ट्र सुधारते,” बच्चू कडू याची टीका; म्हणाले, “तिथेच चिरीमिरी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एवढ्या मोठ्या माणसानं (छगन भुजबळ) असं बोलायला नाही पाहिजे आणि आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांच्या लेकरांविरुद्ध तर बोलायलाच नाही पाहिजे. कोटी ही गोष्टच आम्हाला माहीत नाही आणि तुम्ही ५० कोटींबद्दल बोलत आहात. पण कोटी ही तुम्हाला माहीत आहेत, म्हणून तुम्ही आतमध्ये (तुरुंगात) जाऊन बेसन खाऊन आलात,” अशी बोचरी टीका मनोज जरांगे यांनी केली.