महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलं पाहिजे. कुणबी आणि मराठा एकच आहेत याचे पाच हजार पुरावे सापडले आहेत. आता सरकारला काय ट्रकभर पुरावे हवेत का? एक पुरावा मिळाला तरी खूप झाला. एका आडनावचे लोक एका गावात असतील तर त्यात नातं असतंच. मग परत प्रत्येकाला वेगळा पुरावा मागणार का? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. आमचं युद्ध शांततेचं आहे ते रोखणं सोपं नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आम्हाला कुणबीतून आरक्षण हवं आहे ते आम्हाला हवं आहे. गोरगरीब मराठ्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. आरक्षण आम्ही मिळवणारच असा निर्धारच जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आता जर आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही तर मात्र जे आंदोलन होईल ते सरकारला झेपणार नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

शिंदे समितीवर मनोज जरांगे पाटील यांची टीका

मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीने एक कोटी दस्तावेज तपासले. त्यातून त्यांना पाच हजार पुरावे मिळाले आहेत. जे सापडले नाहीत त्यात काय होतं? आम्हाला ते सांगणार आहात का? काहींवर शेती लिहिलं आहे तो माणूसही कुणबीच झाला असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. शिंदे समिती हैदराबादला जाते, मुंबईला येते पण यांना पुरावेच कसे सापडत नाहीत? त्यांनी अभ्यासकच बरोबर नेले नव्हते. एक पुरावा मिळाला तरीही तो आधार आणि पाच हजार पुरावे मिळाले तरीही आधारच. त्यामुळे कायदा लागू करण्यासाठी हे पुरावे पुरेसे आहेत. कोट्यवधी लोक माझ्या सभेला आले होते. त्यांची वेदना आम्ही मांडली. आता सरकारला आरक्षण द्यावंच लागेल त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आत्ताचा वेळ हा आम्ही घेतलेला नाही हा सरकारने आमच्याकडे मागितला आहे. चाळीस वर्षांपासून हा लढा सुरु आहे. आमच्या प्रत्येक पिढीने आरक्षणासाठी लढावं हे आता खूप झालं. आमच्या वेदना समजून घ्या अशी विनंती आम्ही आता सरकारला करतो आहोत असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे, विदर्भातल्या शेतकऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं आहे. मग आम्हाला का दिलं जात नाही? असाही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. tv9 मराठी ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

२४ तारखेला काय करणार?

मराठा आरक्षण दिलं गेलं नाही तर आम्ही २२ तारखेला पुढची दिशा ठरणार. आम्ही कुणाच्या लांगुलचालनासाठी नाही तर आमच्या बांधवांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन सुरु केलं होतं. आता सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आंदोलन होणार. पण आता जे आंदोलन होईल ते सरकारला झेपणार नाही असा इशाराच आता मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आम्ही एकाच मुद्द्यावर आंदोलन करतो आहे की आम्ही निकषात बसतो का नाही? आमच्या अर्ध्या भावांना व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं आहे कारण त्यांचा व्यवसाय शेती आहे. मग आमच्याकडे काय समुद्र आहे का? असा उपरोधिक सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे आणि व्यवसायाच्या आधारे आम्हालाही कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. आता जे आंदोलन आम्ही करु ते पहिलं आणि शेवटचं असेल. आम्ही एका मंत्र्यांना असं विचारलं की काहींकडे एकही कागद नाही तरी त्यांना पोटजाती म्हणून आरक्षण दिलं आहे. मग कुणबीची पोटजात मराठा होत नाही का? असा प्रश्नही मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.

संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र हवं आहे. कारण आम्ही कुणबी आहोतच. ओबीसी आणि आमच्यात वाद नाहीत. तरीही काही लोक आमच्यात वाद पेटवत आहेत. आम्ही एकमेकांवर माया करतो, साथ देतो मात्र काही लोक आमचे आणि काही लोक तसेच त्यांचे काही लोक आहेत. विदर्भातला सगळा मराठा ओबीसी आरक्षणात गेला आहे. खानदेशमधला गेला आहे मात्र काही लोक आमच्यात वाद कसा निर्माण होईल हे पाहात आहेत असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.