Ajit Pawar On Chicken Mutton Shop Meat Sale Ban : राज्यातील काही महापालिकांनी घेतलेल्या एका निर्णयाची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा रंगली आहे. स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीचा निर्णय काही महापालिकांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. या निर्णयासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीचा निर्णय योग्य की अयोग्य? यावर अजित पवार यांनी हा निर्णय अयोग्य असल्याचं मत माध्यमांशी बोलताना मांडलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीच्या काही महापालिकांच्या निर्णयासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना अजित पावर यांनी म्हटलं की, “मी देखील एक बातमी टिव्हीवर पाहिली की चिकन-मटणावर बंदी ज्याने घातली त्यांच्या कार्यालयांबाहेर जाऊन चिकन-मटण विक्री करणार वैगेरे. मात्र, जेव्हा श्रद्धेचा प्रश्न असतो तेव्हा अशा प्रकारची बंदी घातली जाते. उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास आषाढी एकादशी किंवा महाशिवरात्र असेल किंवा महावीर जयंती असेल. पण स्वातंत्र्य दिन, देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे होत आहेत. कोकणात साधी भाजी करताना सुकट बोंबील करतात. तो त्यांचा आहार आहे. काही जण त्यांना मांसाहारी म्हणत असले तरी तो त्यांचा वर्षानुवर्षे आहार आहे. मग एखाद्याच्या आहारावर अशा पद्धतीने बंदी घालणे योग्य नाही”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

“आता आपल्या राज्यात काही जण शाकाहारी आणि काही जण मांसाहारी आहेत. मात्र, प्रत्येकाला ज्याचा त्याचा आहार घेण्याचा अधिकार आहे. तसेच अशा प्रकारची बंदी घालणं योग्य नाही. महत्वाच्या शहरांमध्ये अनेक जाती धर्मांचे लोक राहत असतात. पण भावनिक मुद्दा असेल तर लोक अशा प्रकारचा निर्णय स्वीकारतात. मात्र, तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला किंवा २६ जानेवारीला किंवा स्वातंत्र्य दिनाला अशा प्रकारे बंधी घालायला लागलात तर अवघड होईल”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

“ग्रामीम भागात अनेक ठिकाणी एखादा कार्यक्रम असेल तर बकरा कापतात आणि मग कार्यक्रम साजरा करतात, लोकांना जेवण देतात. मात्र, चिकन-मटणावर स्वातंत्र्य दिनाला कुठे बंदी घालण्यात आली आहे, याची मी माहिती घेतो. मात्र, याबाबत माझं असं मत आहे की, लोकांच्या भावना महत्वाच्या आहेत. भावनेचा आणि श्रद्धेचा प्रश्न जेव्हा येईल तेव्हा त्या विषयांकडे त्या अनुषंगाने पाहिलं पाहिजे”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे.