scorecardresearch

नक्षलवाद्यांत कमालीचे नैराश्य

एकीकडे मोठी हिंसक कारवाई करण्यात येत असलेले अपयश, तर दुसरीकडे मोठय़ा संख्येने सहकारी मारले जात असल्याने संतप्त झालेल्या नक्षलवाद्यांनी आता सामान्य नागरिकांना लक्ष्य करणे सुरू केले

नक्षलवाद्यांत कमालीचे नैराश्य

एकीकडे मोठी हिंसक कारवाई करण्यात येत असलेले अपयश, तर दुसरीकडे मोठय़ा संख्येने सहकारी मारले जात असल्याने संतप्त झालेल्या नक्षलवाद्यांनी आता सामान्य नागरिकांना लक्ष्य करणे सुरू केले असून दक्षिण गडचिरोलीत गेल्या दहा दिवसात तिघांना ठार करण्यात आले आहे. यात एका ७४ वर्षांच्या वृद्धाचाही समावेश आहे.
पूर्व विदर्भात सक्रीय असलेल्या नक्षलवाद्यांना गेल्या सहा महिन्यात एकही मोठी हिंसक कारवाई या भागात करता आलेली नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नक्षलवाद्यांनी कोरची तालुक्यातील बडा झेलिया गावात एका शाळेत सुरूंग स्फोट घडवून चार जवानांना ठार केले होते. या घटनेचा अपवाद वगळता अनेकदा सापळा रचून सुद्धा नक्षलवाद्यांना मोठी हिंसक घटना घडवून आणता आलेली नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या नक्षलवाद्यांच्या संतापात आता पोलिसांच्या सक्रीयतेमुळे आणखी भर पडली आहे. गेल्या बारा महिन्यात गडचिरोली जिल्ह्य़ातील पोलिसांनी तब्बल ३६ नक्षलवाद्यांना ठार केले. एवढय़ा मोठय़ा संख्येत सहकारी गमावले जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याने नक्षलवाद्यांच्या वर्तुळात सध्या तीव्र संताप आहे. दोन्ही पातळीवर येत असलेल्या या अपयशाच्या पाश्र्वभूमीवर आता नक्षलवाद्यांनी सहज उपलब्ध होऊ शकणाऱ्या सामान्य नागरिकांना लक्ष्य करणे सुरू केले आहे.
दहा दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी अहेरी तालुक्यातील किष्टापूर गावात आदिवासी समाजातील दोन प्रतिष्ठीत नागरिकांची हत्या केली. या दोघांवर पोलिसांना मदत करण्याचा आरोप ठेवून ठार मारण्यात आले. या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच नक्षलवाद्यांनी काल बुधवारी रात्री एटापल्ली तालुक्यातील मानेवारा गावातील लालसू कोरचा कुमाटी या शेतकऱ्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. कसनसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या गावात प्लॉटून क्रमांक ३ चे नक्षलवादी रात्री आले व त्यांनी ७४ वर्षांच्या या वृद्ध शेतकऱ्याला कुऱ्हाडीने घाव घालून ठार केले. त्याच्या मृतदेहाजवळ नक्षलवाद्यांनी एक पत्रक सोडले असून त्यात या शेतकऱ्याला ‘जनविरोधी’ संबोधण्यात आले आहे.
आधुनिक शेतीचा पुरस्कार करणाऱ्या या शेतकऱ्याला नक्षलवाद्यांनी २००३ मध्ये धमकी दिली होती. याच वर्षी त्याला मारहाण सुद्धा केली होती. त्यानंतर मात्र नक्षलवाद्यांनी या शेतकऱ्याच्या पाळतीवर राहणे बंद केले होते. आता अचानक त्याला जनविरोधी ठरवून ठार मारल्याने पोलीस यंत्रणा सुद्धा चक्रावली आहे. सततच्या अपयशामुळे संतप्त होऊन नक्षलवादी आता निर्दोष व्यक्तींना ठार करू लागले आहेत, असे गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, हा वृद्ध शेतकरी पोलिसांचा खबरी सुद्धा नव्हता. वृद्धत्वामुळे तो गावातून बाहेर सुद्धा जात नव्हता. तरीही त्याची हत्या करून नक्षलवादी केवळ दहशत पसरवत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2014 at 12:39 IST

संबंधित बातम्या