सोलापुरात पुरोगाम्यांची टीका; पवारांविषयी भाष्य करण्याची टाळाटाळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर जिल्ह्य़ातील कोपर्डी बलात्काराच्या घटनेचे निमित्त पुढे करीत अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रात शक्ती पणाला लावून मोर्चे काढले जात आहेत. यामागे जातीचे राजकारण व मतांचे ध्रुवीकरण करण्याचा डाव आखला जात असल्याची प्रतिक्रिया सोलापुरातून उमटत आहे. मात्र मराठा समाजातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी शरद पवार यांचे हे राजकारण असल्याबद्दल स्पष्टपणे मते मांडण्याचे टाळले आहे, तर काँग्रेसच्या नेत्यांनीही शरद पवार यांच्या भूमिकेवर सोयीस्कर भूमिका घेतल्याचे दिसून येते.

माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायदा बदलण्यास प्रखर विरोध केला आहे. कोपर्डी व खर्डीच्या घटना भयानकच आहेत. परंतु या निमित्ताने अ‍ॅट्रॉसिटी कायदा बदलण्याची मागणी करीत मराठा समाज मोठय़ा संख्येने एकत्र येणे हे भयावह  आहे. मुळात मूठभरांचा अपवाद वगळता बहुसंख्य मराठे सामान्य गोरगरीब आहेत. त्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतातील नापिकीमुळे मोठय़ा प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत, त्यांच्याकडे आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्षच केले आहे. समाजातील प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात ही अस्वस्थता बाहेर पडत आहे. त्यामुळे मतपेटीसाठी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात वातावरण पेटवण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया आडम मास्तर यांनी व्यक्त केली.

राज्यशास्त्राचे व सामाजिक चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. एफ. एच. बेन्नूर यांनी, मराठा व दलित समाजात गेल्या काही वर्षांपासून सुप्त संघर्ष सुरू आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे निमित्त पुढे करून आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर मराठा कार्ड वापरले जात असल्याचे मत नोंदविले. शरद पवारांनी मराठय़ांबरोबर मुस्लीम समाजालाही जवळ करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांनी यापूर्वी धनगर व माळी समाजाला वापरले आहे. मराठा समाजातही प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळे पवार हे मराठा मतांची ताकद आपल्या बाजूने उभी राहण्यासाठी हा डाव खेळत आहेत, असा आरोप केला.

समाजशास्त्राचे अभ्यासक प्रा. विलास बेत यांनीही कोपर्डी घटनेनंतर त्यास जातीचा रंग दिला जात असल्याचे नमूद केले. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या वापरावरून जे मुद्दे समोर येत आहेत, त्यात दलित समाजातील तरुणवर्गाची वाढलेल्या दादागिरीविषयी मराठा समाजातील सामान्यजनात खदखद होती. त्याकडे सत्ताकारण व राजकारण करणाऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे प्रस्थापित मराठा नेतृत्व न्याय देत नसल्याची भावना वाढली असताना त्याचा नेमका फायदा सनातनी प्रवृत्ती उठवत असल्याचे मत प्रा. बेत यांनी मांडले.

सकल मराठा समाजाच्या येत्या २१ सप्टेंबर रोजी निघणाऱ्या मूकमोर्चाचे नियोजन करणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी मात्र मराठा समाजाच्या या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. या आंदोलनात पवार किंवा अन्य कोणाही नेत्याचा हात नाही. आज संपूर्ण समाजच रस्त्यावर येतोय. त्याची दखल घ्यावीच लागेल, असे शहाजी पवार यांनी नमूद केले. अशाच स्वरूपाचे मत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे हे व्यक्त करतात.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी शरद पवार यांच्याविषयी भाष्य करण्याचे टाळत, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची अजिबात गरज नसल्याचे सागितले. काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते असलेले प्रा. डॉ. सिद्राम सलवदे यांनी मात्र, हा शरद पवार यांचा डाव असल्याचे मान्य करतात. मराठवाडा नामांतरामुळे शरद पवारांनी जे कमावले, ते मराठा आंदोलनातून गमावले, अशी मार्मिक प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha community reservation march in solapur
First published on: 03-09-2016 at 00:35 IST