पुरेशा पावसाअभावी मराठवाडय़ातील पिकांची स्थिती बिकट आहे. या संदर्भात सरकारकडून आढावा घेण्यात येत आहे. विभागाच्या दृष्टीने लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी औरंगाबाद शहराच्या अल्प भेटीत पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मराठवाडय़ात आलेले फडणवीस यांचे चिकलठाणा विमानतळावर भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वागताचा स्वीकार केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी मराठवाडय़ातील दुष्काळावर वरील भाष्य केले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे, शहराध्यक्ष बापू घडामोडे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, हेमंत खेडकर, दिलीप थोरात, दीपक ढाकणे आदी या वेळी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या मुलीचा उद्या (रविवार) विवाह समारंभ आहे. या निमित्त फडणवीस यांनी रहाटकर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर केशरबाग भागात जैन धर्मगुरू रत्नसुंदर सुरेश्वरमहाराज यांच्या आश्रमात जाऊन भेट घेऊन चर्चा केली. अल्प भेटीनंतर संध्याकाळी उशिरा फडणवीस विमानाने मुंबईला परतले.