आघाडी सरकारमध्ये अर्थ व जलसंपदा ही दोन्ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडेच होती. त्यांनीच हात आखडता घेतल्याने मराठवाडय़ाच्या हक्काचे २५ टीएमसी पाणी आणण्यासाठी निधी खर्च झाला नाही, असा आरोप माजी मंत्री आमदार मधुकर चव्हाण यांनी केला.
गेल्या ५ वर्षांत केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत चव्हाण बोलत होते. कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाविषयी ते म्हणाले, की तुळजापूर तालुक्यात टप्पा क्र. दोनची ८३६ कोटींची कामे मंजूर होती. त्यावर २९४ कोटी खर्च झाला. तुळजापूर तालुक्यात आपल्या काळात ६० साठवण तलाव झाल्याने पाण्याचा प्रश्न मिटला. त्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले. या प्रकल्पावर ५४१ कोटी खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र, त्या वेळी राष्ट्रवादीकडेच खाते असल्याने त्यांनी हात आखडता घेतला व पसा खर्च झाला नाही. या प्रकल्पावर २ हजार ३०० कोटी खर्च अपेक्षित आहे. घाटणे बॅरेजचे कामही ८० टक्के पूर्ण झाले असून उपसायोजना व पांगधरवाडीपर्यंतची कामेही पूर्ण होत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील जनतेला दिलासा देण्याचे काम केले. दुष्काळ, गारपीट यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळवली. आजही शेतकरी संकटात आहे. खरिपाचे उत्पादन घटले. रब्बीची फक्त १४ टक्के पेरणी झाली. त्यात उगवले किती, या बाबत पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या वेळीही शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारला भाग पाडू, असे चव्हाण म्हणाले.
तुळजापूर विकास प्राधिकरणाबाबत चव्हाण म्हणाले, की ३१६ कोटींची कामे मंजूर झाली. पकी २१३ कोटींचा निधी मिळाला व १९५ कोटींचा निधी वितरित झाला. तुळजापूर शहरातील सर्व रस्त्यांची कामे पूर्ण झाली. उर्वरित २० कोटींच्या कामांच्या निविदा काढल्या. अन्य प्रलंबित कामांसाठी प्राधिकरणाची बठक घेण्याबाबत सूचना केल्याचेही ते म्हणाले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्या मदतीने ही कामे पूर्णत्वास जात असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, जि.प.चे अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे उपस्थित होते.
‘पसे देऊनही पाणी नाही’!
मुख्यमंत्र्यांकडून उस्मानाबादच्या पाणीयोजनेसाठी पसे दिले. मात्र, राष्ट्रवादीला जनतेला पाणी देता आले नाही. योजना पूर्ण होताच नारळाचे ढीग फोडले. काही दुकानांतील नारळही संपले. आपणसुद्धा दोन नारळ फोडले. एवढे करूनही त्यांना पाणी देता आले नाही, यावरूनच ‘कार्यक्षमता’ लक्षात येते, असा टोला चव्हाण यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathwada water problem former minister chavan accuse
First published on: 02-11-2014 at 01:53 IST