विक्रेत्यांच्या संतापानंतर निर्णय मागे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता वार्ताहर

पालघर: विक्रेत्यांच्या संतापानंतर अवघ्या आठवडय़ाभरातच पालघर तालुक्यातील आठवडी बाजारबंदी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उठवण्याचा  निर्णय घेण्यात आला. शुक्रवारच्या पालघर आठवडी बाजाराच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेतला गेल्याने शुक्रवारचा भरत असलेला बाजार पूर्णपणे ठप्प पडला.

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर विविध ठिकाणी वाढती गर्दी लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गेल्या गुरुवारी पालघर तालुक्यातील सुरू असलेले आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय अचानकपणे घेण्यात आला. पालघरमध्ये असलेल्या शुक्रवारच्या आठवडी बाजाराच्या एक दिवसाआधी संध्याकाळी जिल्हा प्रशासनाने कोणताही विचार न करता अतिशय घाईघाईने घेतलेल्या बंदीच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांसह विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले होते. पूर्वसूचना देऊन त्यानंतरच बाजार बंद करणे अपेक्षित असताना जिल्हा प्रशासनाने तडकाफडकी निर्णय घेऊन पालघर तालुक्यातील सफाळे, मनोर, पालघरचे बाजार बंद केले.

बाजार बंद केल्याने या बाजारावर अवलंबून असलेल्या गावातील सर्वसामान्य व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल नागरिकांना मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागले. या नागरिकांबरोबरीने लहानसहान दुकानाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करणारे किरकोळ विक्रेते यांनाही बाजार बंदीचा मोठा आर्थिक फटका सोसावा लागला. यानंतर समाजमाध्यमवरून या बाजार बंदी आदेशाला घेऊन विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. बाजारातील विक्रेते, स्थानिक व्यावसायिक महिला, मासळी विक्रेत्या महिला यांना आर्थिक फटका बसत असल्याचे लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने अटी—शर्तीवर बाजार बंदीचा आदेश रद्द करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. मात्र हा निर्णय गुरुवारी संध्याकाळी जाहीर झाल्याने समाजमाध्यमवरून तसेच इतर माध्यमांतून तो सर्वसामान्यांपर्यंत व विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. बाजारबंदीचे आदेश हटवताना काही प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमांचे पालन करून  या बाजारांना परवानगी देण्यात आली असली  तरी शुक्रवारी पालघरच्या आठवडी बाजारात ग्राहकांचा शुकशुकाट होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market close order cancelled within a week dd
First published on: 06-03-2021 at 00:17 IST