नांदेड – आपल्या विवाहित मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारहाण करत हातपाय बांधून विहिरीत ढकलून त्यांची हत्या केल्याचा प्रकार उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे सोमवार (दि.२५) रोजी रात्री उशिरा घडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून उमरी पोलिसांनी मुलीच्या वडलांसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

नांदेडच्या उमरी तालुक्यातील बोरजुनी येथील संजीवनी सुरणे (वय १९) हिचा विवाह एक वर्षापूर्वी गोळेगाव येथील एका तरुणासोबत थाटामाटात झाला होता. लग्नापूर्वी संजीवनी हिचे बोरजुनी गावातील लखन बालाजी भंडारे (वय २०) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनीही लग्नाचा निर्धार केला होता; पण घरच्यांचा विरोध व वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांचा हा निर्धार यशस्वी झाला नाही. एक वर्षापूर्वी संजीवनी हिचे लग्न झाले; पण लग्नानंतरही तिचे लखन भंडारेसोबतचे प्रेमसंबंध कायम होते.

सोमवारी लखन हा संजीवनीला भेटण्यासाठी गोळेगाव येथे तिच्या सासरी आला. या दोघांना एकत्र बघून संजीवनीच्या सासरच्या मंडळींनी वडील मारोती सुरणे यांना ही माहिती सांगितली व मुलीला माहेरी परत घेऊन जाण्यास सांगितले. मारोती सुरणे त्याचे बंधू तसेच संजीवनीचे आजोबा हे गोळेगाव येथे पोहचले. हे तिघे लखन भंडारे व संजीवनीला सोबत घेऊन पायी चालत गावाच्या बाहेर निघाले. त्यानंतर रस्त्यामध्ये त्या दोघांना विचारणा करत प्रियकर लखन भंडारे व जन्मदात्या विवाहित मुलीच्या हाता-पायांना बांधून गोळेगाव-बोरजुनी मार्गावर असलेल्या करकाळा येथील एका ४० फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत ढकलून त्यांची हत्या केली.

या घटनेनंतर संजीवनीचे वडील पोलीस ठाण्यात स्वतःहून दाखल झाले आणि गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. दोघांचे मृतदेह काढण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. प्रारंभी संजीवनीचा मृतदेह आढळला व त्यानंतर लखन भंडारे याचाही मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले. मंगळवारी सकाळी उत्तरीय तपासणी व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर संजीवनी हिच्यावर गोळेगाव येथे तर लखन भंडारे याच्यावर बोरजुनी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणात रात्रीच पोलिसांनी संजीवनीचे आजोबा लक्ष्मण सुरणे, वडील मारोती सुरणे आणि काका माधव सुरणे यांना ताब्यात घेतले. तसेच संजीवनीच्या सासरच्या मंडळींनाही मंगळवारी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. या सर्वांची चौकशी सुरू असून अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

उमरीच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास केला जात आहे. दोन्ही मृतदेह शोधणे, गुन्हा नोंदवणे, संशयितांना ताब्यात घेणे या बाबी उमरी पोलिसांनी सत्वरपणे केल्या. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. जे-जे दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितपणे कायदेशीर कारवाई केली जाईल. – अबिनाशकुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड</p>