शुक्रवारी मध्यरात्रीच्या दरम्यान झोपेत असलेली महिला व तिची तीन वर्षांची मुलगी या दोघींची अनोळखी व्यक्तीने निर्घृण हत्या केली. जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार शिवारात हा प्रकार घडला.
जि.प. बांधकाम विभागात नोकरीस असलेले रामप्रसाद दाभाडे यांची पत्नी नंदा (वय २१) व तीन वर्षांची मुलगी आरती टाकळखोपा रस्त्यावरील दाभाडे यांच्या मालकीच्या शेतातील आखाडय़ावर राहतात. आखाडय़ावर पांडुरंग मारोतराव दाभाडे व देवीदास खाडप हे दोघे सालगडी राहतात. याच आखाडय़ावर नंदा व तीन वर्षांची मुलगी आरती या माय-लेकीची निर्घृण हत्या करण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेतातील पंपाचा वीजपुरवठा सुरू झाल्याने दोघे सालगडी ज्वारी पिकास पाणी देण्यासाठी शेतात निघून गेले. त्या वेळी नंदा व आरती घरात झोपलेल्या होत्या. पहाटेस दोघे सालगडी आखाडय़ावर परतल्यानंतर त्यांना मायलेकी मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. नंदाच्या कानशिलावर व डोळय़ांवर कुऱ्हाडीचे घाव होते. ती रक्ताच्या थारोळय़ात पडली होती, तर तिच्या कुशीत झोपलेल्या आरतीचा गळा दाबून खून केल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून घाबरलेल्या पांडुरंग या सालगडय़ाने आरडाओरड केली. त्याचा साथीदार देवीदास आखाडय़ावर आला. घटनेची माहिती मृत नंदाचे पती रामप्रसाद दाभाडे व पोलिसांना कळविण्यात आली.
पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे, पोलीस निरीक्षक कैलास ओहाळ, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकाला पाचारण केले होते. परंतु गुन्हेगारांचा माग सापडू शकला नाही. शनिवारी संध्याकाळपर्यंत यााबाबत पोलिसात तक्रार नोंद झाली नव्हती.
संग्रहित लेख, दिनांक 7th Dec 2014 रोजी प्रकाशित
तीन वर्षांच्या चिमुरडीसह विवाहितेची निर्घृण हत्या
शुक्रवारी मध्यरात्रीच्या दरम्यान झोपेत असलेली महिला व तिची तीन वर्षांची मुलगी या दोघींची अनोळखी व्यक्तीने निर्घृण हत्या केली. जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार शिवारात हा प्रकार घडला.

First published on: 07-12-2014 at 01:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Married women murder with her daughter