सांगली : थकित मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी महापालिका प्रशासनाने धडक मोहीम हाती घेत सहा मिळकती जप्त करून सील केल्या, जप्ती कारवाईच्या मोहिमेमुळे एकाच दिवसात 33 लाख रुपयांची थकबाकी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली.
मिळकतधारकांकडून सुमारे 94 कोटींची कराची थकबाकी आहे. या थकित कराच्या वसुलीसाठी महापालिकेने कठोर भूमिका प्रथमच घेतली असून, एकाच दिवसात कुपवाडमध्ये 2 आणि मिरजेत 4 मिळकती अशा सहा मिळकती जप्त करून सील केल्या, अशी माहिती सहायक आयुक्त आकाश डोईफोडे यांनी दिली. जप्ती कारवाई सुरू करताच एकाच दिवसात 33 लाख रुपये वसूलही झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या मिळकत कराची थकबाकीची रक्कम 94 कोटी इतकी असून, वसुलीचे प्रमाण कमी आहे. वारंवार नोटीस देऊनही मिळकतधारकांकडून करभरणा करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आयुक्त सत्यम गांधी यांनी कठोर भूमिका घेत जप्ती मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले. यानुसार करभरणा करण्यास टाळाटाळ करणार्यांचे पाणीजोडणी खंडित करणे, नागरी सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद करणे आदी कारवाया प्रस्तावित करण्यात येत आहेत.
मिळकत कराची 50 हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 2095 मिळकतधारकांना जप्ती पूर्व नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. तसेच पाच हजार रुपयांवर थकबाकी असलेल्या 34 हजार 195 मालमत्ताधारकांना जप्ती पूर्व नोटीस वाटप करण्याचे काम चालू आहे. यासाठी भागनिहाय जप्ती व पथके नेमण्यात आलेली आहेत.
थकित कर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाकडून जप्ती व सेवा तात्पुरती खंडित करण्याची मोहिम अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले. महापालिकेच्या सेवा घेत असताना मिळकत धारकांनीही आपली जबाबदारी ओळखून करभरणा वेळेत करावा असे त्यांनी सांगितले.
पाणी पट्टीची देयके मिळकत धारकांना पाठविण्यात अडचणी आल्याने काही प्रमाणात देयके अदा करता आलेली नाहीत. यामुळे आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्य शासनाकडे पाणी पट्टीवरील दंड व व्याज रद्द करून केवळ पाणी पट्टी आकारणी करण्याची सूचना केली होती. यामुळे शासनाने याला मंजुरी दिली असून आता थकित पाणी पट्टीवरील व्याज कमी करण्यात आले असून मूळ पाणी पट्टी एक रकमी भरून या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.