सांगली: राज्याच्या राजकारणातून मातोश्रीचा विषय संपला असून पुन्हा त्यांची कधीच सत्ता येणार नाही असे केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. खारघर येथे झालेला प्रकार म्हणजे नैसर्गिक प्रकोप असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
सांगली लोकसभा मतदार संघाची जबाबदारी भाजपने केंद्रिय मंत्री राणे यांच्यावर सोपवली असून मतदार संघातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी आज सांगली दौरा केला. यावेळी पक्षाच्या सुकाणू समिती व पदाधिकार्यांची बैठक झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राणे म्हणाले, राज्यात आता कोणताही राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाही. विरोधकांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे. यामुळे विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या राजकीय भूकंपाच्या दाव्यांना महत्व द्यावेसे वाटत नाही.
खा. राउत यांनी केलेल्या अबु्रनुकसानीच्या दाव्याबाबत विचारले असता मंत्री राणे यांनी कोण संजय राउत? असा सवाल करीत मी या प्रश्नाबाबत उत्तर देणार नाही असे सांगितले. राउत, शिवसेना, मातोश्री विषय आता माध्यमांनी बंद करावेत.आता काही राहिले नाही विषय संपला आहे. महाराष्ट्रात त्यांची सत्ता आता पुन्हा येणार नाही. खारघर प्रकरणी विचारणा केली असता त्यांनी सांगितले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण वेळी घडलेला उष्माघाताचा प्रकार हा निसर्गाचा कोप आहे. त्यामुळेच ही दुर्घटना घडली. विरोधकांच्या हाती आता काही उरलेले नाही, यामुळे ते या प्रकरणाचे राजकीय भांडवल करीत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, जिल्हा भाजप सुकाणू समितीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीबाबत मंत्री राणे यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे, नीता केळकर आणि खा. संजयकाका पाटील हे उपस्थित होते. तालुका पातळीवरील पदाधिकारी व बूथ प्रमुख यांचीही स्वतंत्र बैठक पार पडली. तत्पुर्वी राणे यांनी सांगलीतील गणेश मंदिरात जाउन गणेशाचे दर्शन घेतले.