अहिल्यानगर: शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल करताना आज, सोमवारी अखेरच्या दिवशी खळबळजनक घटना घडली. भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नी माया अरुण मुंडे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदे गटाच्या विद्या भाऊसाहेब गाडेकर यांना डावलण्यात आल्याने त्यांनी निवडणूक कार्यालय परिसरात आक्रमक पवित्रा घेतला होता.

शेवगावच्या निवडणुकीसाठी १२ प्रभागातील २४ जागांसाठी एकूण २४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी १६ इच्छुकांचे २४ अर्ज दाखल झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी विजय घाडगे यांनी दिली.

दरम्यान भाजपचे अरुण मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पत्नीने शिंदे गटाकडून उमेदवारी केली आहे. आपण बंडखोरी केलेली नाही, भाजपमध्येच आहोत, असा दावा केला. पत्नीने भाजपकडे उमेदवारी मागितली होती, ती मिळाली नाही, त्यामुळे शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली असे त्यांनी सांगितले. भाजपमध्ये आमदार मोनिका राजळे व अरुण मुंडे यांच्यामध्ये मोठे वाद आहेत. त्याचे पडसाद उमटण्याची चर्चा होत आहे. शेवगावमध्ये भाजपने तालुकाध्यक्ष महेश फलके यांच्या पत्नी रत्नमाला फलके यांना उमेदवारी दिली आहे.

नेवाशात नगराध्यक्ष पदासाठी २७ अर्ज

नेवासा नगरपंचायतीसाठी महायुतीतर्फे शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार म्हणून डॉक्टर करण सिंह घुले, माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून नंदकुमार पाटील, आम आदमी पक्षाकडून संजय सुखदान व इंदिरा कॉंग्रेसकडून अल्ताफ पठाण यांच्यासह २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नेवासा नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीची बिघाडी झाली आहे तर महायुतीमधील घटक पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे.

दरम्यान नगर पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मशाल आणि शरद पवार गटाचे तुतारी चिन्ह दिसणार नाही हे स्पष्ट झाले आहे. इंदिरा काँग्रेसने मात्र बोटावर मोजण्या इतकेच उमेदवार दिलेले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची आजच्या, सोमवारी शेवटच्या दिवशी विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. नगराध्यक्ष पदासाठी २७ तर नगरसेवकांसाठी १७१ अर्ज दाखल झाले आहेत.

आज शेवटचा दिवस असल्याने सकाळी नऊ वाजता पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयाच्या आवारात मोठी गर्दी झाली होती त्याचवेळीच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रात्रीचे नऊ वाजूनजातील हे देखील स्पष्ट झाले होते आज नगराध्यक्ष पदासाठी २० तर नगरसेवक पदासाठी १३२ अर्ज दाखल झाले.

दुपारी ३ वाजता कार्यालयातील उपस्थित सर्व उमेदवारांचे अर्ज गोळा करण्यात आले आणि दरवाजे बंद करण्यात आले. यावेळी ८५ उमेदवारी अर्ज नोंदणीचे राहिलेले होते. रात्री सुमारे नऊनंतरही प्रत्येक उमेदवाराची छाननी आणि अर्ज नोंदवून घेण्याची प्रक्रिया चालू होती. उपस्थित उमेदवारांना प्रशासनातर्फेच नाश्ता व पाण्याची सोय करण्यात आली होती.