सोलापूर : संघटितपणे गुन्हेगारी कृत्ये करून, समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांच्या टोळीतील तीन सख्ख्या भावांसह सहा जणांवर सोलापूर शहर पोलिसांनी ‘मकोका’अंतर्गत कठोर कारवाई केली आहे.
फैसल अब्दुल रहीम सालार, सईद ऊर्फ टिपू अ. रहीम सालार व वसीम ऊर्फ मुक्री अ. रहीम सालार यांच्यासह जाफर म. युसूफ शेटे, अनिस अहमद ऊर्फ पापड्या रियाज रंगरेज, अक्रम ऊर्फ पैलवान कय्युम सातखेड अशी मकोकाखाली कारवाई झालेल्या गुंडांची नावे आहेत. या टोळीची विजापूर वेस आणि नई जिंदगी चौकात मोठी दहशत आहे.
शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, नई जिंदगी चौकात गेल्या २ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास सोहेल रमजान सय्यद यास हातउसने दिलेले पैसे मागितले म्हणून जाफर शेटे, टिपू सालार, फैसल सालार व इतरांनी बेदम मारहाण केली होती. त्या वेळी फैसल याने, मी इधर का भाई हूं, कोई आगे नहीं आने का, अशा शब्दांत धमकावले होते. त्यामुळे तेथील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पटापट बंद केली होती. तसेच स्थानिक रहिवाशांनी आपापली घरे बंद केली होती. त्यानंतर या गुंडांपैकी फैसल सालार याने चाकूने सोहेलवर प्राणघातक हल्ला केला. पोलीस आयुक्तांनी सालार टोळीचा मागील दहा वर्षांपासूनच्या गुन्हेगारी कारवाया केल्याच्या नोंदी पाहिल्या असता ही टोळी स्वतःच्या आर्थिक गैरफायद्यासाठी गुन्हेगारी कृत्ये करतात आणि दहशत निर्माण करीत असल्याचे आढळून आले. त्याचा विचार करून पोलीस आयुक्त राजकुमार यांनी या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाखाली (मोक्का) कारवाईचे पाऊल उचलले आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजन माने करीत आहेत.