रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील एकता मार्ग येथील यशोदा अपार्टमेंटच्या वॉचमनच्या खोलीत गो वंश सदृश्य प्राण्याच्या मांस सापडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर जवळच असलेल्या एकता मार्ग येथे गोवंश सदृश्य प्राण्याचा पाय हा अवयव एका ठिकाणी टाकलेला आढळून आला. मंगळवारी रात्री याची माहिती सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांना आणि नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी तिथे गर्दी करत आक्रमक पवित्रा घेतला. याठिकाणी पोलीसही दाखल झाले. यानंतर आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर परिसरात एका दुचाकीवरून तिघेजण तिथे आल्याचे दिसले. त्यातील एक जण हातात पिशवी घेऊन उतरून निघून गेला.
तो माणूस तिकडच्याच एका अपार्टमेंट मध्ये वॉचमन म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या खोलीची झडती घेतली असता तिथे गोवंश सदृश्य प्राण्याचे मांसाचे अवशेष पोलिसांना सापडले. पोलिसांनी पंचांसमक्ष त्याचा पंचनामा केला आणि वॉचमनच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी वॉचमन आणि संबंधित मोटरसायकल वरील त्या दोघांच्या तपासाला सुरुवात केली. मंगळवारी रात्री उशिरा त्या वॉचमन सह अजून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी सकल हिंदू समाजाने या प्रकरणी तात्काळ आणि कडक कारवाई करावी अशी मागणी केली.
याप्रकरणी गोरक्षक सुशील कदम यांनी फिर्याद दाखल केल्यावर एकता मार्ग येथील यशोदा अपार्टमेंटचा वॉचमन रणजीत दमाई त्याची पत्नी आरती रणजित दमाई आणि नासिर मुल्ला या तिघांवर ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या तिघांवरती भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९, ३२५, २३८, ३ (५) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ ए, ५ बी, ५ सी, ९ ए आणि १० अन्वये मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.