“महिलांनी ठरवलं तर त्या काहीही करु शकतात. त्यांच्यामध्ये एक वेगळी शक्ती असते. महिला मुलांना, कुटुंबाला सांभाळू शकतात, कार्यालयीन कामकाज करू शकतात. मात्र, आपण स्वत: ही सर्व कामे करु शकतो का? असा प्रश्न पुरुषांनी स्वतःला विचारावा. पुरुषांनी एक दिवस ही सर्व कामे करुन दाखवावी, मग आम्ही तुम्हाला मानतो” अशा शब्दांत अभिनेत्री रविना टंडन यांनी रविवारी कोल्हापुरात आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित पुरुषांना आव्हान दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतिमा पाटील सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन आणि डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून ‘चला सख्यांनो वारसा संस्कृतीचा जपुया आणि ताकद स्त्री शक्तीची दाखवुया‘ या रॅलीचे येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, पालकमंत्री सतेज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील, संयोगीताराजें छत्रपती, माजी खासदार निवेदिता माने उपस्थित होते.

प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोग

यावेळी ठाकूर म्हणाल्या, “मानवजातीचा परिपूर्ण विकास व्हायचा असेल तर महिलांचा सन्मान व्हायला पाहिजे. त्यांचा आत्मसन्मान वाढवला पाहिजे.” यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाचे कार्यालय सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

दरम्यान, या रॅलीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग नोंदवला. यावेळी बाईक रॅली, महिला सन्मान रॅली तसेच विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी पारंपारिक वेश परिधान केले होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Men should work of women then i would believe in them says ravina tandon aau
First published on: 08-03-2020 at 21:46 IST