राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागात बुलढाणा, चिखली, मलकापूर, मेहकर, खामगांव, जळगाव जामोद, शेगांव, असे सात आगार आहेत. यातून ४६३ बसद्वारा ४४८ फे ऱ्या चालविल्या जातात. शहरी व ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक या फेऱ्यांवर अवलंबून असते. या बसपैकी शंभरहून अधिक बस कालबाह्य़ झाल्या आहेत. त्या नाईलाजाने रखडत-रखडत चालवाव्या लागत आहेत. बरेचदा त्या नादुरुस्त होतात. त्यामुळे प्रवाशांची मोठय़ा प्रमाणावर ससेहोलपट होत आहे.
बुलढाणा विभागात सध्या सात आगार असले तरी, नव्याने होणाऱ्या देऊळगावराजा आगाराची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात नादुरुस्त बसची वाढती संख्या लक्षात घेता आणखी १२५ नव्या बसची आवश्यकता आहे. आणखी शंभर फेऱ्या वाढल्यास प्रवास सुखकर होईल, असे प्रवासी मंडळाचे समाधान टापरे यांनी सांगितले. यांत्रिकांची संख्या कमी असल्यामुळे दुरुस्तीवर परिणाम होत असल्याचे कार्मिक अधिकारी सुभाष पाटील यांनी मान्य केले. ही पदे भरण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या विभागात विभागीय कर्मशाळा व आगार कर्मशाळा अशा आठ कर्मशाळांमध्ये यांत्रिकांची ६९१ एकूण पदे आहेत. त्यापैकी केवळ ४४२ यांत्रिक कर्मचारी कार्यरत आहेत. तब्बल २४९ यांत्रिकांची पदे रिक्त आहेत. विभागीय कर्मशाळेत ४८, खामगांव व चिखली कर्मशाळेत १४, बुलढाण्यात १९, मेहकर येथे २०, मलकापूर येथे १२, जळगांव जामोद येथे ६ पदे रिक्त आहेत. यांत्रिकांच्या अपुऱ्या संख्येमुळे नादुरुस्त बसच्या दुरुस्तीत मोठय़ा प्रमाणावर अडथळे येतात.