सातारा जिल्हा बंदी आदेश झुगारून प्रतापगडावर भवानी मातेचे दर्शन घेऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी जात असताना मिलिंद एकबोटे यांना सातारा पोलिसांनी प्रतापगडावर अटक केली.
प्रतापगड (ता. महाबळेश्वर) आणि वाई येथे शिवप्रतापदिनाचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सातारा, पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्य़ातून शिवभक्त येत असतात. मागील काही वर्षांचा अनुभव विचारात घेऊन प्रतापगड उत्सव समितीला प्रतापगडावर शिवप्रताप दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यास बंदी घालण्यात आली. या नंतर हा कार्यक्रम वाई येथे होऊ लागला. या कार्यक्रमाचे एक संयोजक व प्रतापगड उत्सव समितीचे पदाधिकारी मिलिंद एकबोटे यांच्यावर मागील काही वर्षांपासून कार्यक्रमाच्या पुढे-मागे आठवडाभर अथवा तीनचार दिवस सातारा जिल्हा बंदी घालण्यात येत होती. त्याचप्रमाणे या वेळीही त्यांच्याबरोबरच व्यंकंटेश आबदेव व नितीन िशदे यांना सातारा जिल्हा बंदी आदेश बजावण्यात आला होता. यावर एकबोटे यांनी सातारा जिल्हा न्यायालयात बंदी आदेश मागे घ्यावा आणि प्रतापगडावर पूजेसाठी व तीन चार हजार लोकांना महाप्रसाद करण्याची परवानगी मागितली होती. तशी विनंती त्यांनी वाईच्या प्रातांधिकाऱ्याकडेही केली होती. शासनाने व न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली होती.
प्रतापगड व वाईतील शिवप्रताप दिनाच्या पाश्र्वभूमीवर या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता. वाईपासून प्रातापगडाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावर तपासणी नाकी असतानाही जीनची पॅट, टी शर्ट, डोळ्यावर गॉगल अशा साध्या वेशात महिला पोलिसानी पाहिल्यानंतर ही बाब वरिष्ठांच्या कळविण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या भोवती चौकडी करून त्यांना ताब्यात घेतले. या वेळी प्रतापगडावर पोहोचून भवानी मातेचे दर्शन घेऊन ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. या वेळी त्यांच्या सोबत किमान शंभरावर कार्यकत्रे होते. त्यांनी एकबोटेंना ताब्यात घेण्यास विरोध केला. त्यांना अटक करू नका, त्यांना मारू नका अशी विनवणी कार्यकर्त्यांनी पोलिसांना केली. त्यांनतर त्यांना सातारा येथे घेऊन गेल्याचे समजले.
एकबोटेंना अटक केल्याचे पडसाद वाईच्या कार्यक्रमावर उमटू नयेत म्हणून अटक केल्याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती.