दिगंबर शिंदे

सांगली : बाजरीचे घटते उत्पादन लक्षात घेत शेती आणि पीक पद्धतीत बदल करत राज्याच्या कृषी विभागाने जत तालुक्यातील माडग्याळ येथे बाजरी अभियान राबवले. यामध्ये येथील  शेतकऱ्यांनी जिथे एकरी जेमतेम चार क्विंटल उत्पादन येत असलेल्या शेतात ४३ क्विंटलपर्यंत बाजरीचे उत्पादन घेऊन देशात विक्रम केला आहे.

 जत तालुक्याचा पूर्व भाग कोरडवाहू, मध्यम व हलक्या प्रतीची जमीन असलेला आहे. या भागात खरिपात प्रमुख पीक म्हणून बाजरीची पेरणी केली जाते. या वर्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत बाजरी उत्पादन वाढीसाठी उप विभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग हाती घेण्यात आला. ३० शेतकऱ्यांचा समता शेतकरी गट स्थापन करून ‘एक गाव-एक वाण’ या अंतर्गत खरीप हंगामामध्ये २५ एकर क्षेत्रावर बाजरीची पेरणी करण्यात आली होती. पीक कापणी प्रयोगामध्ये विठ्ठल ईश्वर सावंत यांनी एक एकरात ४३ क्विंटल,  विठ्ठल बाबु चोपडे यांनी ४२ तर नामदेव चनबसु माळी यांनी ४१ क्विंटल उत्पादन घेतल्याचे दिसून आले. हे उत्पादन देशपातळीवर उच्चांकी आहे.

विषमुक्त बाजरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेणखताचा वापर, कमीत कमी रसायन खतांचा वापर, नैसर्गिक रोग नियंत्रण यावर भर दिल्याने ही बाजरी विषमुक्त असल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीवरून दिसून आले. प्रयोगशाळेकडून या बाजरीला तसे प्रमाणपत्र मिळाले असल्याचे कृषी पर्यवेक्षक एल.एम. कांबळे यांनी सांगितले.