scorecardresearch

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींनी घेतलं औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे टीका;जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी आज औरंगाबादमधील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, नेते वारीस पठाण यांची उपस्थिती होती. अकबरुद्दीन ओवेसी हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यावरून सध्या राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. शिवसेना नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खेरे यांनी या ओवेसींच्या कृतीवर टीका केली आहे.

महाराष्ट्राच्या मुस्लिमांना कधी विसरणार नाही –

तर, औरंगाबादमधील एमआयएमच्या जाहीर सभेत बोलताना अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले की, “तुम्हाला किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही मुस्लिमास अकबर ओवेसी कधी विसरणार नाही. मग तो औरंगाबादचा माझा मुस्लीम बांधव असेल किंवा मग मुंबई, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेडचा माझा मुस्लीम बांधव असेल. प्रत्येक तरूण, वृद्धासह माझ्या माता-भगिनींनी ज्यांनी आम्हाला साथ दिली त्यांना कधी ओवेसी कधीच विसरला नव्हता, विसरलेला नाही आणि विसरणारही नाही.”

तसेच, “आम्ही नांदेडहून औरंगाबादला आलो. त्यावेळची परिस्थिती कठीण होती मात्र आम्ही सुरुवात केली होती. फार कमी लोकांसोबत आम्ही सुरुवात केली होती. मात्र आज संपूर्ण महाराष्ट्रात हजारोंच्या नाही तर लाखोंच्या संख्येने लोक जोडले गेले आणि एमआयएम पक्ष महाराष्ट्रातील मुस्लिमांच्या मनावर अधीराज्य गाजवू लागला. त्यांची मनं जिकून त्यांच्या हृदयात स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला. माझ्यासाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे, आज एका शाळेची पायाभरणी केली जात आहे आणि लवकरच याचे काम पूर्णत्वास जाईल.” असंही ओवेसींनी सांगितलं.

ज्यांना केवळ अजान ऐकू येते त्यांनी देखील किमान एक शाळा सुरू करण्याबाबत बोलावं – जलील

औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतल्यानेंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना सांगतिले की, “अकबरुद्दीन ओवेसे हे एका राजकीय पक्षाचे नेते आहेत. ते इथे मोफत शाळा सुरू करत आहेत, मला नाही वाटत कोणत्या राजकीय पक्षाने असा काही उपक्रम केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हैदराबादहून येणं आणि औरंगाबादेत मोफत शाळा सुरू करणे, जी सर्व जाती-धर्मच्या मुलांसाठी असणार आहे. मला असं वाटतं की दुसऱ्या राजकीय पक्षांनी यातून काही तरी शिकायला पाहिजे. मला असं वाटतं की अकबरुद्दीन ओवेसी हैदराबाहून येऊन औरंगाबादेत एक मोफत शाळा सुरू करू शकतो, तर शिवसेनेने अशी घोषणा करावी की ते जर एक करू शकत असतील तर आम्ही दोन करू. भाजपाने सांगितलं पाहिजे की आमचे दोन मंत्री आहेत तर आम्ही अशा चार शाळा सुरू करणार आहोत आणि ज्यांना केवळ अजान ऐकू येते त्यांनी देखील किमान एक शाळा सुरू करण्याबाबत बोलावं. कारण, आज देशाला राज्याला शिक्षणाची खूप आवश्यकता आहे आणि एक चांगला उपक्रम ते आज औरंगाबादेत करत आहेत.”

तसेच, “खुलताबादेत अनेक महापुरुषांचे दर्गा आहेत. खुलताबादला कोणीही गेलं तर तो औरंगजेबच्या कबरीवर जातो. यामध्ये काही वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही. धर्मानुसार तुम्हाला जिथे कबर दिसेल तिथे उभा राहून दर्शन घ्यावं लागतं.” असंही जलील यांनी सांगितलं.

याचबरोबर, आता सगळे रंग आमचे झाले आहेत. हिरवा पण माझा आहे, भगवा पण माझा आहे आणि निळा देखील माझा आहे.” असंही जलील यांनी यावेळी बोलून दाखवलं.

यातून नवीनच काहीतरी राजकारण करण्याचा त्यांचा उद्देश –

तर, “खरं म्हणजे औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन कोणीच घेत नाही. कारण, तो औरंगजेब इतका दुष्ट होता की त्याने सगळ्यांनाच त्रास दिलेला आहे. हिंदुंच्या देव-दैवतांची मंदिरं तोडली, जिझिया कर लावला. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तसेत संत तुकाराम महाराजांची पालखी देखील अडवण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्म नष्ट करण्याचं त्याचे स्वप्न होते. तो अतिशय दुष्ट राजा होता, म्हणून मुस्लीम धर्मातील लोकांनी देखील त्यांच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवलेलं नाही. तिथल्या अन्य दर्गावर लोक जातात, त्या दर्गा वेगळ्या आहेत परंतु औरंगजेबाच्या कबरीवर कोणीच जात नाही. पण आता हे एमआयएमचे लोक तिथे जाऊन आले, यातून नवीनच काहीतरी राजकारण करण्याचा त्यांचा उद्देश दिसतो. तो काही बरोबर नाही.” असं चंद्रकांत खैरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mim leader akbaruddin owaisi visited aurangzebs tomb msr

ताज्या बातम्या