कराड : कराड उत्तरेत (कै.) हिंदुराव चव्हाण यांच्या विचाराचा एक मोठा गट आहे. या गटाचे तुतारी बंद पाडण्यासाठी आम्हाला नेहमीच सहकार्य होते. आज त्यांचा सर्व गट भाजपत सामील झाला आहे. त्याचा निश्चितपणे खूप आनंद वाटत असल्याचे समाधान राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील काँग्रेस नेते (कै.) हिंदुराव चव्हाण यांच्या गटाच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, भीमराव पाटील, महेश जाधव, धैर्यशील कदम, सागर शिवदास आदींची प्रमुख उपस्थिती होती. माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकला चव्हाण, शैलेज चव्हाण, सुदाम चव्हाण यांच्यासह अनेकांनी या वेळी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
जयकुमार गोरे म्हणाले, कोपर्डे हवेली गावच्या विकासाचे जे स्वप्न हिंदुराव चव्हाणांनी पाहिले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि विकासामध्ये राहिलेली विकासकामाची कमतरता भरून काढण्यासाठी कोपर्डे हवेलीला काहीही कमी पडू देणार नाही.
डॉ. अतुल भोसले यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून प्रलंबित सर्व प्रश्न सोडवले जातील याची या वेळी खात्री दिली. तसेच कराड पंचायत समिती इमारतीसाठी स्वातंत्र्यानंतर प्रथमच १५ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल मंत्री गोरे यांचाप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. कराड उत्तरेत एकजूट राहिल्यासच सर्व स्थानिक निवडणुका जिंकण्यात यश येईल, असे सांगत डॉ. भोसले यांनी सर्वांना एकजूट राहण्याचे आवाहन केले. धैर्यशील कदम म्हणाले, हिंदुराव चव्हाण यांनी मला बोट धरून कराड तालुक्यात आणले. विकासकामांच्या माध्यमातून मी त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणार आहे.
रामकृष्ण वेताळ म्हणाले, भाजप हे कुटुंब आहे. या पक्षात सर्वांचा सन्मान केला जाईल आणि १७ गावांचा प्रलंबित विकास पूर्ण करण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य मिळवले जाईल, विकासकामे करण्यात कमी पडणार नसून, स्थानिक जनतेच्या सर्व अपेक्षा, विकासकामे पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही वेताळ यांनी दिली.