Rohit Pawar On Manikrao Kokate : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री माणिकराव कोकाटे मंत्री झाल्यापासून अनेकदा वादात अडकले आहेत. अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वादही झाल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर विधिमंडळाच्या सभागृहातच मोबाइलवर गेम खेळतानाचा त्यांचा एक व्हिडीओ रोहित पवारांनी एक्सवर (ट्विटर) शेअर केला होता. त्यानंतर मंत्री कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

त्यानंतर अखेर त्यांच्याकडून कृषी खात्याचा कार्यभार काढून घेण्यात आला आणि क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी मंत्री कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला होता. या प्रकरणी रोहित पवार यांना मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मानहानीच्या दाव्याची नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील माहिती रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. तसेच रोहित पवार यांनी यावरून मंत्री कोकाटेंवर जोरदार टीका करत मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? असा सवाल केला आहे.

राहित पवार काय म्हणाले?

“माजी कृषिमंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आलीय. कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? शेतकऱ्यांप्रती असलेला आपला कळवळा आणि आपण केलेले पराक्रम सांगण्याची वेगळी गरज नाही. तुम्ही पाठवलेली नोटीस मजेशीर आहे, नोटीस वाचून हसू आवरता आले नाही. पण लक्षात ठेवा, पुराव्याशिवाय मी बोलत नाही. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासकट प्रुफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट प्रुफ करेल”, असं राहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांनी कोकाटे यांच्याबाबत काय पोस्ट केली होती?

“जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!” सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? कधी_शेतीवर_या_महाराज #खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या” अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली होती.