परभणी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे एका कार्यक्रमात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी एका ग्रामविकास अधिकाऱ्याला ‘कानाखाली वाजवीन’, असे वक्तव्य केल्याने नवा वाद उद्भवला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वरून बोर्डीकर यांच्यावर टीका केली. तर ज्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना धमकावले अशांनी आम्हाला शिकवू नये, असे उत्तर पालकमंत्री बोर्डीकर यांनी दिले आहे.

जिंतूर विधानसभा मतदारसंघातील बोरी या गावी घरकुल लाभार्थ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुरही उपस्थित होते. या कार्यक्रमाची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. त्यात एका ग्रामविकास अधिकाऱ्याला पालकमंत्री बोर्डीकर या झापत होत्या. ‘तुला पगार कोण देते, यापुढे अशी चमचेगिरी चालणार नाही. तू गावात काय म्हणाल्या.

दरम्यान, ही चित्रफीत आमदार रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ माध्यमावर प्रसारित करत ‘सभागृहात रमी खेळणारे… पैशाच्या बॅगा भरणारे… डान्सबार चालवणारे… या मंत्र्यांमध्ये आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवणाऱ्यांची भर पडली आहे,’ असे नमूद केले. त्याला बोर्डीकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अर्धवट चित्रफीत प्रसारित करून रोहित पवार यांनी दिशाभूल केली आहे. पोलीस ठाण्यात जाऊन आमदारांशी नीट वाग असे पोलीस अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या रोहित पवारांनी आम्हाला शिकवू नये, असेही बोर्डीकर म्हणाल्या.

आपल्या वक्तव्याची मोडतोड करण्यात आली आहे. मागचे पुढचे संदर्भ न देता ते दाखवण्यात आले आहे. संबंधित ग्रामसेवक विधवा महिलांकडे पैसे मागून त्यांना ग्रामपंचायतीत लुडबुड करणाऱ्या एका स्थानिक कार्यकर्त्याकडे पाठवून त्यांचा छळ करत होता. जनसामान्यांना त्रास देणारे कर्मचारी असतील तर त्यांच्याविरुद्ध संताप व्यक्त होणारच. महिला भगिनींच्या तळमळीतून माझे ते वक्तव्य आहे.- मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री तथा पालकमंत्री, परभणी