गणेशोत्सवातील गाठीभेटींमुळे राज्यात नवी समीकरणांची चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुप्त भेट घेतल्याचं बोललं जातं आहे. या भेटीनंतर अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे काही आमदार भाजपाच्या संपर्कांत असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. त्यातच आता अशोक चव्हाण यांच्याबाबत भाजपा नेते आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“अशोक चव्हाण यांचा प्रस्ताव आला तर विचार करु. त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. भाजपा पक्ष श्रेष्ठीच त्यासंदर्भातील निर्णय घेतील. काँग्रेस पक्षाला काय भविष्य राहिलं आहे. त्यामुळे कार्यकर्ते आता आपला विचार करत आहेत. अशोक चव्हाण आणि माझी याबाबत चर्चा झाली नाही,” असे स्पष्टीकरणही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
“माझी त्यांच्याशी कोणतीही…”
सध्या राज्यात सुरु असलेल्या तर्कवितर्कांच्या चर्चेंवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अशोक चव्हाण यांनी माझी कुठलीही भेट घेतलेली नाही. एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी मी पोहचलो आणि तेही पोहचले. ते दर्शन घेऊन निघाले तेवढ्यात मी पोहचलो. असं तर सगळ्यांचं होतं. मात्र, माझी आणि त्यांची कुठलीही भेट झालेली नाही,” असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे.
“ते वृत्त खोडसाळपणाचे”
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चा फेटाळल्या आहेत. ट्विट करत त्यांनी याप्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारं आहे. अशोक चव्हाण हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहेत. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबाबात जबाबदारीने वृत्तांकन करण अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भाने चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे, माध्यमांनी हे थांबवावं,” अशी विनंती बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.