कराड : राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याणमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकताच मेघदूत या शासकीय बंगल्यात विधिवत गृहप्रवेश केला. विशेष म्हणजे, याच वास्तूमध्ये त्यांचे आजोबा, राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई हे मंत्रिपदाच्या कार्यकाळात वास्तव्यास होते. त्याच वास्तूतून पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याची भावना शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे.
मेघदूत बंगल्याचे पाटण तालुक्याशी असलेले भावनिक नाते आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्यकाळातील जनसंपर्क, जनतेशी असलेली नाळ या सर्व भावनिक व ऐतिहासिक आठवणींना याप्रसंगी उजाळा मिळाला. त्या काळात गावोगावचे नागरिक आपल्या कामांसाठी या बंगल्यात आवर्जून येत असत आणि लोकनेते बाळासाहेब देसाई हे त्यांचे प्रश्न तत्परतेने सोडवत असत.
सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर महायुती सरकारमध्ये अपेक्षेप्रमाणे मंत्रिपद मिळाल्यानंतर शासकीय बंगल्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी मेघदूत बंगला मिळावा, ही शंभूराज देसाईंची खास मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आणि त्यानुसार ही ऐतिहासिक वास्तू पुन्हा एकदा देसाई कुटुंबाच्या सेवेसाठी खुली झाली.
गृहप्रवेशाच्या वेळी बंगल्याच्या प्रांगणात लोकनेते (कै.) बाळासाहेब देसाई (कै.) वत्सलादेवी देसाई व (कै.) शिवाजीराव देसाई यांच्या प्रतिमांचे पूजन या वेळी करण्यात आले. या भावनिक व ऐतिहासिक क्षणी शंभूराज देसाई यांचे पुत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थाध्यक्ष रविराज देसाई आणि देसाई कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते.
( चार पिढ्यांचा साक्षीदार मेघदूत )
मेघदूत बंगला हा देसाई कुटुंबाच्या चार पिढ्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा साक्षीदार ठरला आहे. लहानपणीच शंभूराज देसाई यांनी या वास्तूमध्ये आपल्या आजोबांकडून राजकारण व समाजकारणाचे बाळकडू घेतले. आज त्याच ठिकाणी मंत्री म्हणून त्यांचे पुनरागमन झाले आहे, हा एक दुर्मीळ योगायोग ठरल्याचे मानले जात आहे.
( वारसा पुढे चालवणारे नेतृत्व )
लोकनेते बाळासाहेब देसाई यांची परखड कार्यशैली आणि सामान्य जनतेसाठी झटण्याची वृत्ती हे गुण मंत्री शंभूराज देसाई यांच्यातही दिसून येतात. त्यामुळे ‘मेघदूत’ बंगल्यातील मंत्री शंभूराज देसाई यांचा गृहप्रवेश आणि या निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या येथील आठवणींना मिळालेला उजाळा चर्चेचा विषय बनला आहे.